धाराशिव : मध्यप्रदेशातून पिस्टल तसेच तलवारी खरेदी करून त्यांची विक्री करण्यासाठी तुळजापूर तालुक्यात फिरणाऱ्या एका तरुणाला गुन्हे शाखेने गुरुवारी रात्री बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीचा अन्य एक साथीदार मात्र अंधाराचा फायदा घेत पसार झाल्याची माहिती पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.
एका काळ्या रंगाच्या आलिशान कारमध्ये दोन व्यक्ती असून, एकाच्या कमरेला पिस्टल अडकविलेले आहे. ही कार लातूर-तुळजापूर रोडने कामठा शिवारात येत असल्याची माहिती गुरुवारी सायंकाळी गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर अधीक्षक नवनीत काँवत यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक मनोज निलंगेकर यांनी उपनिरीक्षक संदीप ओहोळ, कर्मचारी वल्लीवुल्ला काझी, शौकत पठाण, जावेद काझी, अमोल निंबाळकर, साईनाथ आशमोड, पांडुरंग सावंत, विजय घुगे, वैशाली सोनवणे, शैला टिळे यांचे पथक तयार करून कामठा शिवारात सापळा रचला.
माहितीप्रमाणे एक काळ्या रंगाची कार कामठा शिवारात येताच पथकाने त्यास थांबण्याची सूचना केली. यातील तरुणाची व कारची झडती घेतली असता, एक पिस्टल व दोन तलवारी गुन्हे शाखेच्या हाती लागल्या. आरोपी तरुणास ताब्यात घेऊन प्राथमिक चौकशी केली असता, त्याने त्याचे नाव ओंकार प्रदीप कांबळे (वय १८, रा. काक्रंबा) असे सांगितले. तेथून पळून गेलेला त्याचा दुसरा साथीदार असून, दोघांनीही पिस्टल मध्यप्रदेशातून खरेदी करून ती विक्रीसाठी तुळजापूर तालुक्यात आणल्याची कबुली दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी त्याच्याकडील कारसह पिस्टल, तलवारी असा सुमारे १४ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन आरोपीस अटक केली आहे.