उस्मानाबाद : ज्या रुग्णांना मध्यम लक्षणे आहेत व त्यांना ५ लीटरपर्यंत ऑक्सिजन पुरेसे आहेत, अशा ग्रामीण भागातील रुग्णांसाठी ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रात ४०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्याचे नियोजन गुरुवारी झालेल्या आढावा बैठकीतून करण्यात आले. शिवाय, ग्रामीण रुग्णालयांत ३०, तर प्राथमिक आरोग्य केंद्रात १० बेडच्या सोयीचे नियोजन करण्याची सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य यंत्रणेला केली आहे.
जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. यात आयसीयु अद्ययावत करण्यासाठी व्हेंटिलेटर्सच्या देखभालीचा व ऑक्सिजन पुरवठा साधनांच्या स्वच्छतेचा कार्यक्रम नियमित राबविण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. किमान २० ते ३० सिलिंडर्सची गरज भागवू शकतील, असे लिक्विड मेडिकल ऑक्सिजन व हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारे प्रकल्प उभारणीचे काम टास्क फोर्सने तत्काळ हाती घेण्यास सांगण्यात आले. यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सध्या पॉझिटिव्हिटी रेट हा १८ टक्केपर्यंत खाली आहे. मात्र, तरीही हा रेट ५ टक्के इतका होईपर्यंत खबरदारी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. तसेच खासगी रुग्णालयात जादा दराने बिल आकारणी झाल्यास याबाबत मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुरेश केंद्रे यांच्याकडे तक्रार करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यांना द्या लसीकरणात प्राधान्य...
माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षणात ५ हजार २८३ रुग्ण आढळून आले आहेत, तर ५९ हजार ७८८ लोक हे कोमॉर्बिड असल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील २४ हजार जणांचे लसीकरण झाले आहे. मृत्यूदर कमी करण्याच्या अनुषंगाने उर्वरित ३५ हजार जणांना लसीकरणात प्राधान्य देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच ज्या गावात चाचण्या कमी होत आहेत, अशा तक्रारी येतात, तेथे तातडीने किट्स पुरविण्याची दक्षता यंत्रणेने घेण्याची सूचना यावेळी करण्यात आली.