(फोटो : २९)
सोनारी : येथील महावितरण उपकेंद्रात सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असणारे भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त मेजर बिभीषण भोसले यांच्या प्रयत्नातून कार्यालय परिसरामध्ये विविध प्रकारच्या १०१ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
मेजर बिभीषण भोसले हे भारतीय सैन्यदलामध्ये २३ वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झाले आहेत. दोन महिन्यापूर्वीच त्यांची सोनारी येथील महावितरण उपकेंद्रात सुरक्षारक्षक म्हणून नेमणूक झाली. ते येथे रूजू झाले तेव्हा कार्यालय परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले होते. चारही बाजूने काटेरी झुडपांचा विळखा होता. कार्यालयातील खुर्च्या व टेबल यांची देखील मोडतोड झालेली होती. शौचालयाची दुरवस्था झाल्याने कर्मचाऱ्यांना उघड्यावर जावे लागत होते. ही बाब लक्षात येताच मेजर भोसले यांनी स्वतः पुढाकार घेऊन स्वखर्चाने जेसीबी व मजुरांच्या साह्याने परिसरातील काटेरी झुडपे काढून कार्यालयाची स्वच्छता करून घेतली. शिवाय, उपकेंद्रातील काही कर्मचारी व ग्रामपंचायतीच्या मदतीने कार्यालयाच्या परिसरात १०१ वृक्षांची लागवडही करण्यात आली.
यावेळी मेजर बिभीषण भोसले, उपसरपंच सुभेदार मांडवे, ग्रामपंचायत सदस्य संभाजी सुरवसे, माजी सरपंच नवनाथ जगताप, भाऊसाहेब पाटील, औदुंबर गाडे, कर्मचारी दीपक ईटकर, प्रणित शिंदे आदी उपस्थित होते.
दुरुस्तीचे काम झाले अर्धवट
सोनारी महावितरण उपकेंद्राच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झाला होता. परंतु, संबंधित गुत्तेदाराकडून अर्धवट काम करण्यात आलेले आहे. यानंतर अधिकाऱ्यांनीही याकडे दुर्लक्ष केले. वरिष्ठांनी लक्ष देऊन अपूर्ण कामे पूर्ण करून घेण्याबाबत सूचना करण्याची गरज भोसले यांनी यावेळी व्यक्त केली.