कारी : हवामान बदलामुळे शेती व शेतीव्यवसाय धोक्यात आला आहे. पाण्याचा सुयोग्य वापर करून शेतीचे नियोजन करावे. पारंपरिक पिकांच्या मागे न लागता पोखरा योजनेच्या माध्यमातून बांबू लागवड, रेशीम उद्योग, फळबाग लागवड करून शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण करावा. सूक्ष्म सिंचनाचा वापर करून पाण्याचा सुयोग्य वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कौस्तुभ दिवेकर यांनी यावेळी केले.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात तिसऱ्या टप्प्यात निवडण्यात आलेल्या उस्मानाबाद तालुक्यातील अंबेजवळगा या गावी जिल्हाधिकारी यांनी भेट दिली. या योजनेतून झालेली शेततळे, फळबाग लागवड, पॉलिहाऊस या कामांची पाहणी केली. यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे यांनी खरीप हंगामाची तयारी म्हणून घरचे सोयाबीन बियाणे उगवणक्षमता तपासून वापरावे. ८० ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन केले. तुळजापूर कृषी विज्ञान केंद्रातील कार्यक्रम समन्वयक सचिन सूर्यवंशी यांनी बी.बी.एफ. पेरणी व त्याचे फायदे याबाबत प्रात्यक्षिकासह माहिती दिली. यावेळी महिला शेतीशाळेतील महिला शेतकऱ्यांनी घरगुती सोयाबीन बियाणांची उगवणक्षमता तपासणी करणे, बीजप्रक्रिया करणे याबाबत प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. सरपंच आनंद कुलकर्णी यांनी पोक्राच्या माध्यमातून गावामध्ये फळपिकांचे क्षेत्र वाढत असल्याचे सांगितले. प्रगतिशील शेतकरी राजेसाहेब देशमुख यांनी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून गावामध्ये तरुणांना रोजगार निर्मिती करणार असल्याचे सांगितले. कृषी साहाय्यक वैभव लेणेकर यांनी दहा टक्के खतांच्या बचत मोहिमेविषयी माहिती दिली.
वैयक्तिक लाभात तालुका राज्यात दुसऱ्या स्थानी
यावेळी कृषी साहाय्यक माजीद शेख यांनी उत्कृष्ट काम केल्याबद्दल व पदोन्नती मिळाल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर जाधव यांनी वैयक्तिक लाभ देण्यामध्ये उस्मानाबाद तालुका राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असून, यापुढे सदर योजनेला गती देऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळवून देणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमास प्रकल्प विशेषज्ञ सचिन पांचाळ, मंडळ कृषी अधिकारी प्रवीण झांबरे, जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी चेतन जाधव, कृषी साहाय्यक, माजीद शेख, आर. बी. आडसूळ व महिला शेतकरी उपस्थित होते.