धाराशिव : गुटखा व तंबाखू विक्री करु देण्यासाठी एका व्यक्तीकडून १२ हजाराची लाच घेणाऱ्या शहर पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी रंगेहात पकडले.
गुटखा व तंबाखू विक्रीचा व्यवसाय सुरु करु देण्यास व त्यानंतर कारवाई न करण्यासाठी शहर पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार महादेव शिंदे (४५) याने एका व्यक्तीकडे १५ हजार रुपयाची मागणी केली होती. मात्र, तक्रारदारास लाच देणे मान्य नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रार प्राप्त होताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी शहर पोलिस ठाणे परिसरात ट्रॅप लावला. तक्रारदार सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पोलिस ठाणे परिसरात पोहोचला असता, हवालदार महादेव शिंदे याने तक्रारदाराकडून १५ हजाराऐवजी तडजोडीअंती १२ हजार रुपये पंच साक्षीदारा समक्ष स्वीकारले. यावेळी लागलीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यास ताब्यात घेतले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
यांनी केली कारवाईही कारवाई धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक सिध्दराम म्हेत्रे, पोलीस निरीक्षक विकास राठोड, पोलीस अंमलदार मधुकर जाधव, आशिष पाटील, विशाल डोके यांच्या पथकाने केली.