तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील पिंपळा (बु.) येथील पोलीस पाटील महादेव नरवडे यांनी गावकऱ्यांत कोरोनाविषयी जनजागृती तसेच त्यांचे प्रबोधन करण्याचे काम हाती घेतले आहे. यासोबतच लसीकरणासाठी वाहनाची देखील सोय केली आहे.
पिंपळा (बु.) गावात लस घेणाऱ्या नागरिकांचे प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे लसीकरणाचे महत्त्व ते पटवून देत आहेत. येथील ग्रामस्थांना लस घेण्यासाठी बारा किमी अंतरावरील काटगाव येथे जावे लागत असल्याने महादेव नरवडे व कुबेर उत्तम नरवडे यांनी स्वखर्चातून खासगी वाहनांची सोयदेखील उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत येथील २७ नागरिकांचे लसीकरण केले असून, यानंतरही लस उपलब्ध असेल तेव्हा ही सोय केली जाणार आहे.
यासाठी प्रत्येकाच्या घरापर्यंत वाहन पाठविले जात आहे. कोरोना विरुद्ध लढाईत लसीकरण करणे हाच रामबाण उपाय आहे. त्यामुळे शेतातील कामे बाजूला ठेवून लसीकरणाबाबत असणारे गैरसमज दूर सारून, लसीकरण करावे, असे आवाहन पोलीस पाटील महादेव नरवडे यांनी केले आहे. या कामी सामाजिक कार्यकर्ते कुबेर नरवडे, विनोद चव्हाण, धनाजी पाटील, विजयकुमार जाधव, भीमराव जाधव, मंगेश जाधव, परवेझ शेख व ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य देखील त्यांना सहकार्य करीत आहेत.