शिंगोली, तडवळ्यात पोलिसांची कारवाई
उस्मानाबाद : येथील आनंदनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने २३ डिसेंबर रोजी तालुक्यातील शिंगोली येथे छापा टाकला. यावेळी तेथील ‘धम्मदीप पानटपरी’ मधून कल्याण मटका जुगाराचे साहित्य व रोख ५२० रुपये असा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी भारत वाघमारे (रा. शिंगोली) आणि रमेश धोत्रे (रा. वरूडा) या दोघांविरुध्द येथील आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अपात्र शेतकऱ्यांकडून अनुदान रकमेची वसुली
कळंब : तालुक्यातील ९७ गावांतील ९५४ शेतकऱ्यांनी अपात्र असतानाही पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या ७४ लाख ६२ हजार रुपये अनुदानाचा लाभ घेतल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे हा नधी परत घेण्यासाठी तहसीलदारांनी या शेतकऱ्यांना नोटीस बजावली आहे. यात आयकर भरणा करणाऱ्या ७८९ व अपात्र १६५ अशा एकूण ९५४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. तीन दिवसांत महसूल विभागाच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुनर्वसनाच्या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार
तुळजापूर : तालुक्यातील धनेगाव गावाचे पुनर्वसन करावे, यासह इतर मागण्यांसाठी ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे, १९९३ साली झालेल्या भूकंपानंतर धनेगाव येथील घरांची पडझड झाली. गावानजीकचा येमाई तलाव फुटण्याची भीती असल्याने ग्रामस्थांनी प्रकाश देशमुख यांच्या शेतात वस्ती केली. यानंतर पुनर्वसनासाठी वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप हा प्रश्न मार्गी लागला नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
लसीकरणाबाबत जेवळीत प्रशिक्षण
जेवळी : लोहारा तालुक्यातील जेवळी येथे कोरोना लसीकरणासंदर्भात आरोग्य कर्मचारी, आशा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. पहिल्या टप्प्यात आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आशा, अंगणवाडी कार्यर्ती, मदतनीस यांना ही लस दिली जाणार आहे. या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्रात सदरील प्रशीक्षणाचे आयोजन केले होते. योवळी वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. के. शेख, समुदाय आरोग्याधिकारी डॉ. सूर्यवंशी, डॉ. पिचे, आरोग्य सेविका राजापुरे, गायकवाड आदी उपस्थित होते.
दोन्ही कालव्यांतून रबीसाठी पाणी
लोहारा : तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पातील डाव्या व उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे. लातूरचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तीन पाणीपाळ्या सोडण्याच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली होती. यानंतर लातूरचे उपविभागीय अधिकारी एस. जी. कागे यांच्या उपस्थितीत प्रथम पाणीपाळी शनिवारी सोडण्यात आली. यामुळे रबी पिकांना याचा चांगला फायदा होणार आहे.
दिव्यांगांची गैरसोय
(फोटो : सूरज २४)
उस्मानाबाद : येथील सामाजिक न्यायभवनासाठी तीन मजली इमारत उभारण्यात आली आहे. परंतु, येथे लिफ्टची व्यवस्था नाही. त्यामुळे दिव्यांगांची गैरसोय होत असून, येथे लिफ्टची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
रेंज मिळेना
(फाईल फोटो)
येणेगूर : येणेगूरसह परिसरातील गावांत बीएसएनएल तसेच इतर खाजगी कंपन्यांच्या मोबाईलचीही सेवा वारंवार विस्कळीत होत आहे. यामुळे ग्राहक त्रस्त झाले असून, ऑनलाईन शिक्षणावरदेखील याचा परिणाम होत असल्याचे चित्र आहे.
दोघांवर गुन्हा
ढोकी : येथील पोलीस ठाण्याच्या पथकाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून सोमनाथ पवार व दत्तात्रय शेळके यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त केली. तसेच त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
येरमाळ्यात कारवाई
येरमाळा : येथील पोलीस ठाण्याच्या पथकाने भीमनगर भागात छापा टाकला. यावेळी किरण सोमनाथ कसबे हा २४ डिसेंबर रोजी जुगाराचे सहित्य व रोख ६५० रुपयांसह आढळून आला. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोर्चेबांधणीस वेग
अणदूर : येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून, सध्या मोर्चेबांधणीस वेग आला आहे. गुरुवारी एक अर्ज दाखल झाला असून, सोमवारपासून मोठ्या संख्येने अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.