लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रस्त्यावर जखमी झालेल्या कुत्र्याच्या पिलाला इतर लोकांकडून त्रास दिला जात होता. या संदर्भात एका पशुप्रेमी नागरिकाने चक्क रात्री १२ वाजता थेट पोलीस अधीक्षकांना ईमेल करून माहिती दिली. विशेष म्हणजे एसपींनी तातडीने दखल घेत घटनास्थळी पोलीस पाठवून त्या पिलाला दवाखान्यात रवाना केले. कोरोनाच्या धावपळीतही पोलिसांनी प्राण्यांविषयी दाखविलेल्या या संवेदनशीलतेची चर्चा आहे.ही घटना भोसा परिसरातील आहे. गुरुवारी रात्री येथे घाटंजी बायपासवर कुत्र्याचे पिलू जखमी अवस्थेत पडलेले होते. त्यावेळी काही मुले त्याला दगड मारत होते. तर मोठे कुत्रे त्याचे लचके तोडण्याच्या तयारीत होते. त्याच वेळी आशीर्वाद सोसायटीतील रहिवासी सूरज नायर यांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी लगेच जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षकांना ईमेलद्वारे घटनेची माहिती आणि फोटोही पाठविले. साध्या मोकाट कुत्र्याची प्रशासन काय दखल घेणार असे वाटत असताना सूरज नायर यांना लगेच स्थानिक गुन्हे शाखेतून आकाश नामक पोलीस कर्मचाऱ्याचा फोन आला. आम्ही सकाळीच येऊन कुत्र्याचे पिलू घेऊन जाऊ असे या कर्मचाºयाने सांगितले. तोवर सूरज याने हे पिलू स्वत:च्या घरी घेतले. शुक्रवारी सकाळीच एलसीबी पथकाचे प्रमुख प्रदीप शिरस्कार, आकाश सहारे आणि इतर कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी थेट पिलू ताब्यात घेऊन पोलीस वाहनातून दवाखान्यात नेले. एकीकडे कोरोनामुळे शहरात असलेली संचारबंदी, त्यासाठी पोलिसांचा ठिकठिकाणी लागलेला बंदोबस्त या कामाच्या ताणातूनही पोलीस प्रशासनाने जखमी मूक प्राण्यासाठी संवेदनशीलता दाखविली.
जखमी कुत्र्यासाठी धावून आले पोलीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 6:00 AM
रस्त्यावर जखमी झालेल्या कुत्र्याच्या पिलाला इतर लोकांकडून त्रास दिला जात होता. या संदर्भात एका पशुप्रेमी नागरिकाने चक्क रात्री १२ वाजता थेट पोलीस अधीक्षकांना ईमेल करून माहिती दिली. विशेष म्हणजे एसपींनी तातडीने दखल घेत घटनास्थळी पोलीस पाठवून त्या पिलाला दवाखान्यात रवाना केले. कोरोनाच्या धावपळीतही पोलिसांनी प्राण्यांविषयी दाखविलेल्या या संवेदनशीलतेची चर्चा आहे.
ठळक मुद्देएसपींची मध्यरात्री दखल : सामान्य नागरिकाने केला ईमेल