उमरगा (उस्मानाबाद ) : मांस वाहतूक करणाऱ्या मालवाहतूक टमटमसह एका टेम्पोवर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकाने कारवाई केली़ ही कारवाई रविवारी रात्री उमरगा तालुक्यातील नारंगवाडी पाटी जवळ करण्यात आली़ यावेळी चार टन मांसासह नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ या प्रकरणी पाच जणांविरूध्द उमरगा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.
परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांच्या विशेष पथकाने रविवारी रात्री नारंगवाडी पाटीवर नाकाबंदी केली होती़ यावेळी राबविलेल्या तपासणी मोहिमेत उस्मानाबाद येथून लोहारा मार्गे येणाऱ्या मालवाहतूक टमटम (क्र.एम एच २५- पी ५५२५) व टेम्पोची (क्र. एम एच २५- पी ३१८५) तपासणी केली़ त्यावेळी दोन्ही वाहनात मांस असल्याचे निदर्शनास आले़ पोलिसांनी दोन्ही चालकासह वाहने ताब्यात घेऊन उमरगा पोलीस ठाणे गाठले़ तेथे पाहणी केली असता दोन्ही वाहनात प्रत्येकी दोन टन प्रमाणे चार लाख रूपये किंमतीचे चार टन मांस आढळून आले़.
पोलिसांनी चार लाखाचे मांस व पाच लाखाची दोन्ही वाहने असा एकूण नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त केला़ दोन्ही चालकांकडे कसून चौकशी केली असता हे मांस उस्मानाबाद येथून हैद्राबादला घेऊन जात असल्याचे समोर आले़ या प्रकरणी पोहेकॉ किरण कोळेकर यांच्या फिर्यादीवरून चालक मजहर सत्तार कुरेशी, दुसरा चालक रमजान अब्दुल सय्यद, शहाबाज शिकुर कुरेशी, मुस्तफा जाफर कुरेशी, आखलाख खैरुद्दीन कुरेशी (सर्व रा.उस्मानाबाद) यांच्या विरूध्द महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५ (अ क) ९ (अ) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दोन्ही चालकांना अटक करण्यात आले आहे़ तपास तपास पोउपनि सुभाष माने हे करीत आहेत. जप्त केलेल्या मांसाची पालिकेमार्फत विल्हेवाट लावण्यात आली़