उमरगा : शिवसेनेचे मंत्री असलेल्या नगरविकास खात्याकडून नगराध्यक्षांना बडतर्फ करण्यात आल्यानंतर उमरगा तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. राज्यात सत्तेत एकत्र असलेले शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी हे पक्ष उमरगा तालुक्यात; मात्र एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहेत. राष्ट्रवादीकडे असलेल्या सहकार खात्याकडून जुलै महिन्यात मुरूम बाजार समिती बरखास्त केल्यानंतर काँग्रेसला हा दुसरा धक्का आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यात राजकीय वर्चस्वाची तुंबळ लढाई स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे.
उमरगा तालुक्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे राजकीय वातावरणदेखील तापू लागले आहे. शिवसेना आक्रमकपणे मैदानात उतरणार असल्याचे दिसून येत असून, काँग्रेसच्या विरोधात त्यांनी राष्ट्रवादी, भाजपशी जवळीक साधण्यास सुरुवात केली आहे. वर्षानुवर्षे काँग्रेसच्या ताब्यात असलेली मुरूम बाजार समिती बरखास्त होणे हा काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या बालेकिल्ल्यावर केलेला पहिला वार होता. यापाठोपाठ आता राष्ट्रवादीचे नगरसेवक संजय पवार यांच्या तक्रारीवरून काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या उमरगा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे यांना लाखो रुपयांचा गैरव्यवहार, विहीत प्रक्रियाचा अवलंब न करणे, आदी मुद्द्यांवरून शिवसेनेचे मंत्री असलेल्या नगरविकास खात्याने गुरुवारी नगराध्यक्षापदावरून अपात्र ठरवून, सहा वर्षे निवडणूक लढविण्यास प्रतिबंधित केले आहे. एकूणच हे कारवाईसत्र राजकीय दबावातून झाल्याच्या चर्चा असून, यातून काँग्रेसची होणारी बदनामी येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी व भाजपच्या पथ्यावर पडणार आहे.
तालुक्याच्या ग्रामीण भागात काँग्रेसचे चांगले नेटवर्क असून, सहकार क्षेत्रातही ते प्रबळ आहेत. याच माध्यमातून त्यांनी तालुक्यातील राजकारणावर पकड ठेवलेली आहे. परंतु, गेल्या दोन वर्षांत शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले व किरण गायकवाड यांनी तालुका पिंजून काढला असून, गावागावांत शिवसंपर्क अभियानातून पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. मर्यादित भागात अस्तित्व असणारे राष्ट्रवादी व भाजप हेदेखील अनुकूल वाऱ्याच्या दिशेने आपले पाऊल टाकत आहेत.
चौकट...........
भाजपला प्रथमच नगराध्यक्षपद
काँग्रेस व शिवसेनेच्या भांडणात भाजपला कायम फायदा मिळत आला असून, ते कायम सत्तेत भागीदार ठरत आलेले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादीला विरोध म्हणून भाजपला उपनगराध्यक्ष पद देऊन काँग्रेसने पालिकेत सत्ता स्थापन केली होती. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे यांना विरोध करीत भाजपने विरोधकांशी हातमिळवणी केली. आता नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे यांच्या बडतर्फीनंतर नगराध्यक्ष पदाचा कारभार भाजपचे उपनगराध्यक्ष हंसराज गायकवाड हे सांभाळणार आहेत. त्यामुळे पालिकेच्या इतिहासात प्रथमच भाजपला नगराध्यक्षपद मिळणार आहे.