लोहारा : तालुक्यातील तावशीगड ते करजगाव रस्त्यावरील चोपन ओढ्यावर उभारलेल्या पूल सध्या धोकादायक बनला आहे. पुलावर केलेला सिमेंट रस्ता पूर्णपणे उखडला असून, त्यातील सळई देखील वर आल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
लोहारा तालुक्यातील तावशीगड गावापासून एक किमी अंतरावर करजगावाकडे जाणाऱ्या चोपन ओढ्यावर जिल्हा परिषदेने सिमेंटच्या नळ्या टाकून हा पूल उभारला. यावर सळई टाकून सिमेंट रस्ता तयार करण्यात आला. परंतु, काही महिन्यातच हा रस्ता उखडला. त्यातच गेल्या वर्षी व यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, सिमेंट रस्ता उखडला असल्याने सळई वर आली आहे. रोज ये-जा करणाऱ्या चारचाकी, दुचाकी वाहन चालकास सळई वर आल्याचे माहिती असल्याने ते सावधपणे वाहन चालवितात. परंतु, या रस्त्यावर एखादा अनोळखी वाहन चालक आल्यास एकदम सळई समोर दिसते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच पुलावर जागोजागी खड्डेही पडल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनधारकांमधून केली जात आहे.
कोट.......
तावशीगड व करजगाव रोडच्या मध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या चोपन ओढ्यावरील पुलाची स्थिती गंभीर बनली आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन जीवघेण्या पुलाचे काम तात्काळ हाती घेऊन अपघाताचा धोका टाळण्याची गरज आहे.
- रामचंद्र गायकवाड, ग्रामस्थ, तावशीगड
तावशीगड ते करजगांव रस्त्यावरील चोपन ओढ्यावर उभारलेल्या पुलाची दुरवस्था झाली असून, याबाबत संबंधित विभागाकडे तावशीगड ग्रामपंचायतकडून वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु, याकडे लक्ष देण्यास प्रशासनाकडे वेळच नाही.
- गजानन मिटकरी, ग्रा.पं. सदस्य, तावशीगड
तावशीगड ते करजगाव रस्त्यावरील पुलाची प्रत्यक्ष पहाणी केली असून, कार्यालयाकडे पुलाच्या दुरुस्तीसंदर्भात प्रस्तावही दाखल केला आहे. प्रत्यक्ष काम सुरु होण्यास किमान दोन महिने तरी लागतील.
- आर. सी. चव्हाण, शाखा अभियंता, जि. प. बांधकाम विभाग