उस्मानाबाद : जिल्ह्यात नाफेडमार्फत मूग, उडीद, सोयाबीनसाठी १० खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले आहेत़ मात्र, यातील ३ केंद्रांवर अद्याप एकाही शेतकऱ्याने मूग, उडीद, सोयाबीनच्या विक्रीसाठी नोंदणी केलेली नाही़ त्यामुळे या केंद्रांवर शुकशुकाट आहे़ तर इतर ७ केंद्रांवर ७८३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे़ यातून खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद असल्याचे स्पष्ट होते़
जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले़ त्याची शासकीय मदत सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे़ परतीच्या पावसाने सर्वाधिक सोयाबीन पिकाचे नुकसान झाले़ बाधित क्षेत्रावरील सोयाबीन हे दिवसेंदिवस पाण्यात उभे होते़ तसेच, काढून ठेवलेल्या सोयाबीन गंजीत पाणी घुसण्यामुळे सोयाबीन काळवंडले़ आता कुठे शेतरस्ते वाहतुकीयोग्य होत आहेत़ त्यामुळे शेतकऱ्यांचा सध्या कल हा गंजी लावून ठेवलेल्या सोयाबीनच्या राशी करण्याकडे आहे़
यामुळेच खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांचा अल्प कल आहे़ शासनाकडून आधारभूत खरेदी केंद्रांमधून खरेदी होणाऱ्या सोयाबीनसाठी ३ हजार ७१० रूपये, मूगासाठी ७ हजार ५० रूपये तर उडीदासाठी ५ हजार ७०० रूपये प्रति क्विंटलप्रमाणे दर ठरविण्यात आले आहेत़ जिल्ह्यात नाफेडमार्फत सोयाबीन, मूग, उडीदासाठी १० खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले़ त्यानुसार या खरेदी केंद्रांवर शेतकरी आपल्या शेतमालाची नोंदणी करीत आहेत़ जिल्ह्यात सुरू असलेल्या नाफेडच्या १० खरेदी केंद्रांपैकी ७ खरेदी केंद्रांवर उपरोक्त शेतमालाच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे़ तर वाशी, नळदुर्ग व तुळजापूर येथे असलेल्या केंद्रांवर अद्यापपर्यंत एकाही शेतकऱ्याने नोंदणी केलेली नाही़ ७ केंद्रांवर ७८३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे़ नोंदणीसाठी उपरोक्त तिन्ही धान्यांसाठी १५ डिसेंबरची अंतिम मुदत देण्यात आलेली आहे़