उस्मानाबाद -अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्या चालकाला महसूल विभागाच्या पथकाची चाहूल लागताच वाळू जागेवरच ओतून चालक ट्रॅक्टरसह पसार झाला. ही घटना ईटकूर शिवारातील वाशिरा नदी पात्रात घडली. याप्रकरणी चालकाविरूद्ध कळंब ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कळंब तालुक्यातील ईटकूर शिवारातील वाशिरा नदी पात्रात वाळूचे अवैधरीत्या उत्खनन सुरू असल्याची खबर महसूल विभागाच्या पथकाला लागली हाेती. त्यानुसार पथकाने १९ मे राेजी नमूद ठिकाणी छापा मारला. यावेळी चालक लक्ष्मण श्रीपती देसाई (रा. ईटकूर) हे विना नाेंदणी क्रमांकाच्या ट्रॅक्टर ट्राॅलीमध्ये वाळू भरताना आढळून आले. दरम्यान, महसूल विभागाचे पथक आल्याची चाहूल लागताच देसाई यांनी वाळू जागेवरच ओतून ट्रॅक्टरसह पाेबारा केला. या प्रकरणी सरकारच्या वतीने तलाठी प्रवीण पालके यांनी कळंब पाेलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून संबंधित चालकाविरूद्ध भादंसंचे कलम ३७९, ५११ सह गाैण खनिज अधिनियम कायदाचे कलम २१ (१) (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.