तामलवाडी : शेतीपंपाच्या वीजजोडणीसाठी डिमांड भरल्यानंतर महावितरणने खांब उभारून वीजजोडणी दिली खरी. मात्र, सहाच महिन्यांत कर्मचाऱ्यांनी येथील वीज वाहिन्या काढून नेल्यामुळे तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) शिवारातील शेतकऱ्याची सध्या विजेअभावी गैरसोय होत आहे.
सांगवी (काटी) शिवारात ज्ञानेश्वर विश्वभंर मगर यांची सहा एकर जमीन आहे. पिकाला पाणी देण्यासाठी त्यांनी विहीर खोदली असून, वीजजोडणीसाठी महावितरण कंपनीकडे पाच अश्वशक्तीच्या विद्युत पंपासाठी डिमांड रक्कमदेखील भरली. यानंतर महावितरण कंपनीने ठेकेदारामार्फत विजेचे १६ खांब उभे करून तारा ओढून मगर यांना वीजजोडणी दिली. परंतु, जानेवारी २०२१मध्ये जोडणी केलेल्या तारा वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी काढून नेल्या. त्यामुळे येथील वीजपुरवठा खंडित झाला. मगर यांचे रब्बी हंगामातील पीक पाण्याअभावी वाळून गेले. शिवाय, पाळीव जनावराना घागरीने उपसून पाणी पाजण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. पाण्याअभावी दोन पाळीव जनावरांचा बळीदेखील गेला. त्यामुळे विजेच्या ताराची जोडणी करून शेती पंपासाठी वीजपुरवठा करावा, अशी मागणी मगर यांनी केली आहे.
चौकट.....
अन्यथा उपोषण करू
सांगवी गावापासून पूर्व बाजूस दोन किमी अंतरावर शेतकरी ज्ञानेश्वर मगर यांची शेती असून, तेथे पाच ते सहा पाळीव जनावरे आहेत. विजेअभावी जनावरांची पिण्याच्या पाण्यासाठी गैरसोय होऊ लागल्याने त्यांनी गोठ्यावर मुक्कामी असलेली ही जनावरे आता घराजवळ आणली आहेत. येथे पाणी, वैरणीची सोय करून पशुधन जगविण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. त्यामुळे येत्या १५ दिवसांत वीजजोडणी नाही दिल्यास महावितरण कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.