एटीएममध्ये खडखडाट; नागरिकांची गैरसोय
कळंब : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर जिल्ह्यात कडक जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. या कालावधीत केवळ मेडिकल, हाॅस्पिटल सुरू राहणार आहेत. तर इतर सर्व आस्थापना बंद राहणार आहेत. यात बॅंकांचाही समावेश असल्याने शहरातील अनेक बॅंका बंद आहेत. त्यामुळे विविध बॅंकांच्या एटीएममध्ये पैशांचा तुटवडा निर्माण झाला झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. शहरातील एटीएममध्ये खडखडाट असल्याने रुग्णांच्या उपचारासाठी पैसे कोठून आणावेत, असा प्रश्न नागरिकांसमोर उभा ठाकला आहे.
चिंचपूर येथे जंतुनाशकाची फवारणी
भूम : तालुक्यातील चिंचपूर ढगे येथे कीर्तिश्वर प्रतिष्ठानच्या वतीने संपूर्ण गावात जंतुनाशकाची फवारणी करण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय काळे, उपाध्यक्ष बालाजी तांबे, तानाजी ढगे, दत्ता तांबे, भगवान पाटील, तानाजी विधाते, अमोल ढगे, अविनाश ढगे, वैभव जाधव, लखन जाधव, सुदर्शन तांबे, कृष्णा विधाते, अंगद ढगे, महादेव ढगे, समाधान ढगे, प्रवीण शिंदे, अक्षय शिंदे, प्रदीप ढगे, विकीन तांबे, समाधान मातने, बाळासाहेब अंधारे, विठ्ठल ढगे, अविनाश विधाते, आनंद मुनोत आदींची उपस्थिती होती.
तुळजापुरातील भिकाऱ्यांवर उपासमारीची वेळ
तुळजापूर : जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी ८ ते १३ मे या कालावधीत जिल्हाभरात कडक जनता कर्फ्यू लागू केला आहे. त्यामुळे तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मातेचे मंदिर बंद असल्याने मंदिर परिसरातील भिकाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्यां भाविकांच्या देणगीतूनच परिसरातील भिकाऱ्यांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, मंदिर बंद असल्याने भाविकांचा ओघ कमी झाला आहे. परिणामी येथील भिकाऱ्यांची उपासमार होत असून, भिकाऱ्यांसाठी किमान दोन वेळच्या जेवणाची सोय करावी, अशी मागणी होत आहे.
घारगावात कोरोना प्रतिबंधक उपाययोजना
परंडा : तालुक्यातील घारगाव येथे कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यानिमित्त ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. ग्रामस्थांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना मोफत औषधी वाटप करण्यात आली आहे. यावेळी सरपंच अमोल काळे, उपसरपंच सचिन सुरवसे, तलाठी खळदकर, ग्रामसेवक भिसे उपस्थित होते. ग्रामस्थांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहनही यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.
भोसगा येथे कोरोनाबाबत जनजागृती
लोहारा : तालुक्यातील भोसगा ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना विषाणूबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच विविध उपाययोजना करून ग्रामस्थांनी विनाकारण घराबाहेर फिरू नये, मास्क, सॅनिटायझरचा वारंवार वापर करावा, याबाबत आवाहन करण्यात आले. यावेळी सरपंच शशिकला गोसावी, अन्वर शहा, शिवशंकर हत्तरगे, हरूबाई कागे, राजामती कागे, सविता कागे, मारुती गायकवाड, शिवशंकर बिराजदार, अजिज शहा, पोलीसपाटील ज्योती हत्तरगे, ग्रामपंचायतीचे शिपाई मारुती नायकवडे आदींची उपस्थिती होती.
अडीचशे कुटुंबीयांना वाफेचे मशीनचे वाटप
जेवळी : लोहारा तालुक्यातील वाडी वडगाव येथे हेल्पिंग हॅण्ड ग्रुपच्या वतीने २५० कुटुंबीयांना वाफेचे मशीन, मास्कचे वाटप करण्यात आले. या ग्रुपच्या माध्यमातून गावात कोरोनाबाबतही जनजागृती करण्यात येत आहे. यावेळी ग्रुपचे सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.