कळंब : उत्तर भारतामधील ‘रसोई’ घरात मानाचे स्थान असलेल्या, तितक्याच लज्जतदार व ‘हेल्दी’ राजमाचे उत्पादन आता कळंब तालुक्यातही घेतले जात असून, विविध गावांच्या शिवारात या नव्या पिकाची दमदार ‘एन्ट्री’ झाली आहे.
काळाच्या ओघात पीक पद्धतीत अमूलाग्र बदल होत असतात. बदलते हवामान, प्रचलित पिकांची उत्पादकता, आहारातील स्थान व बाजारातील मागणी अशा काही घटकांमुळे लागवडीखालील पिकांच्या क्षेत्रात बदल नोंदविले गेले आहेत. हे सारे नकळत घडत जाते. खरीप व रब्बी हे दोन्ही प्रमुख पीक हंगाम असलेल्या कळंब तालुक्यातील पीक पद्धतीने काळानुरूप वारंवार अशी ‘कात’ टाकली आहे. मागच्या दोन दशकात तर अशा बदलाची व्याप्ती एवढी जास्त होती की, तालुक्यातील सारे शेती क्षेत्र नव्या वळणावर जाऊन ठेपले आहे. यातूनच अन्नधान्य, कडधान्याचे क्षेत्र घटत तालुक्याची नकळत ‘सोयाबीनचे कोठार’ अशी ओळख निर्माण झाली. यातच सूक्ष्म सिंचन साधनांचा अधिकाधिक वापर करत ‘कमी पाण्यात जास्त क्षेत्र’ सिंचनाखाली आणण्याचाही स्तुत्य प्रयत्न होताना दिसून येत आहे. तालुक्यातील शेती क्षेत्रात असे बदल दृष्टिपथात दिसत असतानाच, लहान कारळे, करडी अशी काही पिके केवळ नावालाच उरल्याचे दिसत आहे.
एकीकडे उत्पादकता, न मानवणारे हवामान यामुळे काही पिके पूर्वेतिहासाचा भाग बनत असताना, मागच्या खरीप हंगामापासून तालुक्यात ‘राजमा’ या नव्या पिकाने दमदार ‘एन्ट्री’ केली आहे. तालुक्यातील ईटकूर, कोठाळवाडी, भोगजी, आडसूळवाडी, आथर्डी आदी अनेक गावांत जवळपास एक हजार एकरच्या आसपास या नव्या पिकांची लागवड होत यशस्वी उत्पादन घेण्यात शेतकऱ्यांना यश आले आहे.
चौकट...
राजमा, घेवडा अन् पावटा
राजमा हे एक बदामाच्या आकाराचा दाणा असलेले शेंगवर्गीय पीक आहे. यास उत्तर भारतात ‘राजमा’, तर पश्चिम महाराष्ट्रात ‘घेवडा’ या नावानेही ओळखतात. यातच कळंब व वाशी तालुक्यातील नवउत्पादक शेतकऱ्यांनी त्यास स्वतःचे असे ‘पावटा’ हे आणखी एक नाव दिले आहे. याची पेरणी करताना एकरी पंचवीस किलो बियाणे लागते; तर आठ ते दहा क्विंटल सरासरी उत्पादन मिळते. यास सध्या नऊ हजारांचा दर असला, तरी आजवर सरासरी सहा हजारांचा दर मिळाला असल्याने चाळीसेक हजारांचे नगदी उत्पन्न देणारे हे कमी जोखमीचे पीक आहे, असे काका मोरे यांनी सांगितले.
बारमाही पीक
राजमा हे वर्षातील तीनही हंगामात घेतले जाणारे पीक आहे. साधारणतः ७५ दिवसांत हाती पडणारे हे पीक खरिपात जून, रब्बीत ऑक्टोबर, तर उन्हाळी पीक जानेवारी, फेब्रुवारीत पेरले जाते. पेरणी ते काढणीदरम्यान केवळ दोन फवारण्या कराव्या लागत असल्याने कमी खर्चिक आहे. चाळीसेक शेंगांना सहा-सात दाणे लागणाऱ्या पिकावर सध्या फक्त माव्याचा प्रादुर्भाव होतो. पाण्याचे योग्य नियोजन केल्यास वर्षातून तीन हंगामात हाती येणारे हे पीक सध्या अनेकांना लळा लावत असल्याने बियाण्याचा दर शिखरावर पोहोचला आहे.
काय होते या शेतमालाचे
उत्तर भारत, पंजाब आदी भागात आहारात ‘राजमा’चे मोठे स्थान आहे. लज्जतदार रस्सा भाजी ते राजमा राईस असे विविध ‘मेनू’ अनेकांना भावतात. शिवाय आरोग्यदायी घटक असल्याने ‘शुगर ते बिपी’ अशा गंभीर आजारांनाही हे पीक हलकं करणारं आहे. उत्तर भारतातील विविध राज्यांच्या आहारात समाविष्ट असल्याने व काही देशात याची मागणी वृद्धिंगत होत असल्याने या ‘हेल्दी’ राजम्याची मागणी वाढत आहे. मागणी, पुरवठा व उत्पादन यांच्या तुलनेत याचे ‘अर्थशास्त्र’ समतोल राहिले तर हे पीक नक्कीच पुढील काळात मुख्य पिकांच्या यादीत दिसून येईल, अन् हा समतोल बिघडला तर बियाण्याचे पैसे निघणेही मुश्किल होईल.