उस्मानाबाद : देशात तुरीसह अन्य कडधान्यांचे माेठ्या प्रमाणात उत्पादन हाेत आहे. असे असतानाही केंद्र सरकारने कडधान्यांची आयात सुरू केली आहे, तर दुसरीकडे रासायनिक खतांच्या दरामध्ये प्रचंड वाढ करून शेतकऱ्यांना जास्तीच्या आर्थिक संकटात लाेटले आहे. केंद्र सरकारच्या या धाेरणाचा निषेध करीत प्रहार संघटनेच्यावतीने गुरुवारी सायंकाळी ताली अन् थाळी बजाव आंदाेलन करण्यात आले. यानंतर प्रशासनाला निवेदनही देण्यात आले.
केंद्र सरकारने २०२०-२१ साठी कडधान्यांची आयात खुली केली आहे. मात्र, भारताकडे ४५ लाख टन तूर उपलब्ध होणार आहे. भारताची तुरीची गरज ४३ लाख टन आहे. म्हणजेच गरजेपेक्षा २ लाख टन तुरीचे जास्त उत्पादन होणार आहे. मात्र केंद्र सरकारने सहा लाख टन तूर आयात केली आहे. केंद्र सरकारने तूर, मूग व उडीद यांची आयात आता पूर्णपणे खुली केली आहे. याची अधिसूचना १५ मे २०२१ ला काढली आहे. केंद्र सरकारने मागील तीन वर्षापासून कडधान्य हे प्रतिबंधित वर्गवारीत होते, ते आता खुल्या वर्गवारीत आल्याने याचा परिणाम शेतकऱ्यांवर हाेणार आहे. परिणामी या धाेरणामुळे कडधान्यांचे दर घसरण्याची भीती निर्माण झाली आहे. एकीकडे असा निर्णय घेतला असताना, दुसरीकडे रासायनिक खतांचे दर प्रचंड वाढविले आहेत. पूर्वी डीएपीची १ हजार २०० रुपयांना बॅग मिळत हाेती. आता याच बॅगेची किंमत १ हजार ९०० रुपये केली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात लाेटला गेला आहे. हे चित्र लक्षात घेता, केंद्र सरकारने खतांची दरवाढ रद्द करावी, कडधान्ये आयातीचा निर्णयही मागे घ्यावा, अशी मागणी करीत प्रहार संघटनेच्यावतीने गुरुवारी ताली अन् थाली बजाव आंदाेलन केले.
आंदाेलनात जिल्हाध्यक्ष मयुर काकडे, जिल्हा संघटक बाळासाहेब कसबे, बाळासाहेब पाटील, महादेव खंडाळकर, नवनाथ मोहिते, तालुकाध्यक्ष गणेश शिंदे, शशिकांत मुळे, नागेश कुलकर्णी, महेश माळी, हेमंत उंदरे, चित्रा शिंदे, नागनाथ पाटील, सांगळे, अजीम खजुरे, शौकत मसुलदार, अभिजित साळुंके, श्रीमंत गरड आदींनी सहभाग नाेंदविला.