लोहारा : एकीकडे शेती करण्यावर यांत्रिकरणावर भर दिला असतानाही दुसरीकडे मात्र आज ही बैलजोडीला सोन्याचा भाव असल्याचे करजखेडा येथील जनावरांच्या बाजारात दिसून आले.
उस्मानाबाद तालुक्यातील करजखेडा चौरस्ता येथे दर रविवारी जनावरांचा आठवडी बाजार भरतो. या बाजारासाठी उस्मानाबाद तालुक्यासह लोहारा, उमरगा, औसा, बार्शी, सोलापूर, तुळजापूर, परंडा, अक्कलकोट, लातूर, निलंगा, केज आदी तालुक्यातील व्यापारी, शेतकरी येतात. यात जनावरांच्या खरेदी-विक्री व्यवहारातून लाखो रुपयांची उलाढाल होते. या जनावरांच्या बाजारात शेळी मेंडीसह बैलजोडी, गाय म्हैस विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात येतात. शेतकऱ्यांसह मोठ्या प्रमाणात व्यापारीही याची खरेदी-विक्री करतात.
एकीकडे शेतात सालगड्याला वर्षाला एक ते दीड लाखांपर्यंत पगारी आहेत. त्यात बैलजोडी संभाळण्याचा वेगळा खर्च. निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पन्नावर परिणाम होत असल्याने, सध्या शेती व्यवसाय परवडत नसल्याचे सांगत, अनेक शेतकरी बैलजोडी व सालगडी ठेवण्यापेक्षा यांत्रिकरणाच्या माध्यमातून शेती करण्यावर भर देत आहेत. असे असले, तरी बैलजोडीला आजही सोन्याचा भाव येत असल्याचे चित्र आहे. करजखेडा चौरस्त्याच्या आठवडी बाजारात रविवारी (२१ फेब्रुवारी) एक लाख साठ हजार रुपयांपर्यंत किमतीच्या बैलजोडी व्यापाऱ्यांनी विक्रीस आणल्या होत्या.
जनावरे संभाळणे झाले कठीण
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतीला बसत आहे. अशा परिस्थितीत बैलजोडी संभाळणे अवघड आहे. घराचा कडबा असल्याने खर्च दिसून येत नसला, तरी बैलांना सकाळ-संध्याकाळ पेंड दिली, तरी दिवसाकाठी १५० ते २०० रुपये खर्च येतो.
- बिभिषण वाडकर, वडगाव (सि), ता.उस्मानाबाद
बैलजोडी संभाळणे म्हणजे हत्ती पोसल्यासारखे आहे. कारण बैलजोडी लाखाची अन् त्याला संभाळण्यासाठी रोजगाराचा खर्च वर्षाला सव्वालाख रुपये. याशिवाय चारा, पेंडीचा वेगळाच खर्च करावा लागतो.
- अविनाश पाटील, झाडी ता. बार्शी
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून नियमित पाऊस नाही. परतीच्या पावसामुळे खरिपाचे नुकसान झाले. त्यात बैलजोडी संभाळाची का संसार, असा प्रश्न असतानाही उसनवारी किंवा कर्ज काडून बैलजोडी सांभाळावी लागते.
- जगदिश पाटील, करजखेडा ता.उस्मानाबाद
चौकट...........
दुधाळ जनावरांची मागणी घटली
१- एकीकडे दुधाळ जनावरांची मागणी घटल्याचे चित्र असले, तरी जनावरांच्या बाजारात दुधाळ जनावरांची ही खरेदी-विक्री होताना दिसत आहे.
२- दुधाळ जनावरांमध्ये गावरान गाय बाजारात विक्री करताना दुर्मीळ दिसत आहेत. विशेषत: जरशी गायीची मागणी अधिक असल्याचे चित्र आहे.
३ - एकीकडे जरशी गायीची मागणी वाढली असतानाच, त्या खालोखाल जरशी म्हशीलाही पशुपालकांतून चांगली मागणी होत आहे.
४ - दुधाळ गायी, म्हशीच्या किमती वाढल्या असून, ३० हजारांपासून ८० हजारांपर्यंत किमती असल्या, तरी शेती व्यवसायाला जोडधंदा करणारे शेतकरी याची खरेदी करताना दिसतात.
चौकट...........
७० ते ८० लाखांची उलाढाल
करजखेडा चौरस्ता येथील दर रविवारी भरणारा जनावरांचा आठवडी बाजार मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यातही प्रसिद्ध आहे. या ठिकाणी शेळ्या-मेढ्यांसह बैलजोडी, गाय, म्हैस आदी जनावरे विक्रीसाठी येतात. या जनावरांच्या बाजारात शेतकरी आपली जनावरे विक्रीस आणतात. व्यापारीही याच्या खरेदी-विक्रीसाठी मोठ्या संख्येने या बाजारात येतात. त्यामुळे या जनावरांच्या बाजारात प्रत्येक आठवड्याला ७० ते ८० लाख रुपयांची उलाढाल होते.
चौकट........
बैलजोडीचा दिवसाचा खर्च
बैलजोडी संभाळण्याचा खर्च हा अधिकच आहे. शेतकऱ्याकडे स्वत:च्या शेतातील कडबा, वैरण असेल व तो स्वत:च संभाळ करत असेल, तर पेंडीचाच खर्च शेतकऱ्यांना येतो. मात्र, सालगडी ठेवून बैलजोडी सांभाळायची असेल, तर खर्च वाढतो. कारण सालगड्याचा वर्षाचा लाख-सव्वालाख रुपये पगार, त्यात वैरणीचे वाढलेले भाव या सर्वाचा हिशोब घातला, तर एक बैलजोडी संभाळायला वर्षाकाठी दोन ते अडीच लाख रुपये खर्च येतो. त्यात बैलजोडीचा दिवसाचा खर्च पाहता, चारा व रोजगारी यासाठी सहाशे ते आठशे रुपये येतो. अशी परिस्थिती असतानाही शेतकरी जनावरे संभाळायला कचरत नाही.
फोटो - उस्मानाबाद तालुक्यातील करजखेडा चौरस्ता येथील रविवारच्या जनावरांच्या बाजारात जिवाची वाडी (ता.केज) येथील प्रभू वामन नागरगोजे या शेतकऱ्याच्या बैलजोडीला १ लाख २५ हजार रुपये मिळाले आहेत. छाया/बालाजी बिराजदार