बलसूर : उमरगा तालुक्यातील कलदेव निंबाळा येथे जवळपास एक कोटी खर्च करुन प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची सुसज्ज इमारत उभारण्यात आली आहे. इमारतीचे काम पूर्ण होऊनही बरेच महिने झाले आहे. परंतु, येथे अद्याप कर्मचाऱ्याची नियुक्ती झाली नसल्याने प्रत्यक्ष कामकाजास प्रारंभ होऊ शकला नाही. परिणामी ही इमारत धूळखात पडून आहे.
गावात आरोग्य सेवा उपलब्ध नसल्यामुळे कलदेव निंबाळा येथील ग्रामस्थांना उपचार घेण्यासाठी येणेगूर, उमरगा, सास्तूर या ठिकाणी जावे लागत आहे. त्यामुळे हे उपकेंद्र सुरु झाल्यास जवळपास साडेतीन हजार लोकसंख्या असलेल्या कलदेव निंबाळा गावाला गावातच प्रथमोपचार मिळणार आहेत.
सध्या एकीकडे कोरोनाचा उद्रेक वाढला असल्याने आरोग्य विभागास उपलब्ध इमारती अपुऱ्या पडत आहेत. तर दुसरीकडे सुसज्ज इमारती अशा वापराअभावी धूळखात पडून आहेत. दरम्यान, ग्रामपंचायतीने यासंदर्भात सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. व्ही. वडगावे यांना निवेदन देऊन येथे कर्मचारी नियुक्तीची मागणीही करण्यात आली आहे. परंतु, याबाबत अद्याप कार्यवाही झाली नाही.