(फोटो : उन्मेष पाटील १५)
कळंब : कळंब शहरातील स्वच्छता हे आमचे सर्वोच्च प्राधान्य असून, याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. नागरिकांच्या सफाईबाबतच्या तक्रारीचे त्वरित निराकरण झाले पाहिजे. अन्यथा, कार्यवाहीस सामोरे जावे लागेल, असा इशारा उपनगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी सफाई कंत्राटदार व नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाला दिला.
कळंब शहरातील स्वच्छतेबाबतच्या वाढत्या तक्रारी व साथीचे रोग याबाबत विशेष सर्वसाधारण सभेनंतर बऱ्याच सदस्यांनी सूचना मांडल्या. त्याची नोंद घेत सोमवारी नगरपालिका कार्यालयातील दालनात उपनगराध्यक्ष तथा स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती संजय मुंदडा यांनी नगरसेवक, न. प. स्वच्छता विभाग कर्मचारी व स्वच्छता कंत्राटदारांची संयुक्त बैठक बोलाविली होती. या बैठकीस राष्ट्रवादीचे गटनेते लक्ष्मण कापसे, स्वछता समितीचे सदस्य सतीश टोणगे, स्वच्छता विभागच्या अधिकारी पी. डी. कदम, कार्यालयीन अधीक्षक दीपक हारकर, स्वच्छता निरीक्षक संजय हाजगुडे, कल्याण गायकवाड यांच्यासह सफाई कंत्राटदार स्वयंभू ट्रान्सपोर्टचे शिंदे, माळी आदींची यावेळी उपस्थिती होती.
या बैठकीत घंटागाडी दररोज प्रत्येक घरी पोहोचावी यासाठी सकाळ व संध्याकाळ चार-चार तास असे एकूण दररोज आठ तास फिरवून कचरा संकलन करावे. तसेच मजूरसंख्या मोठ्या प्रमाणात वाढवून साफसफाई व फवारणीची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सक्त सूचना देण्यात आल्या. तसेच घंटागाडी व साफसफाईचे अचूक वेळापत्रक बनवून सर्व सदस्यांना वितरित करणे व कोणाच्याही सांगण्यावरून त्यात बदल न करण्याची तंबी संबंधितांना देण्यात आली.
कंत्राटदारांच्या प्रतिनिधींनी कामाबाबत मिळालेल्या सूचनांचा स्वीकार करून आठवडाभरात गुणवत्ता वाढवून काम सुनियोजित करण्याचा शब्द देत तक्रारीचा त्वरित निपटारा करण्यात येईल, असे सांगितले.