उस्मानाबाद : भरधाव खासगी बसने समाेरून येणा-या रिक्षाला जाेराची घडक दिली. या घटनेत चालकासह रिक्षातील प्रवासी जखमी झाले. ही घटना उमरगा शहरानजीक घडली. या प्रकरणी २० फेब्रुवारी राेजी बसच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कर्नाटक राज्यातील राजुरी (ता. आळंद) येथील गुरुनाथ ढगे हे रिक्षा (क्र. एमएच.१२-८२४१) घेऊन जात हाेते. ते उमरगा शहरानजीकच्या खसगी गावच्या नदी पुलाजवळ आले हाेते. याचवेळी समाेरून भरधाव येणा-या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन हयगयीने व निष्काळजीपणे चालवून रिक्षाला जाेराची धडक दिली. या अपघातात रिक्षा पलटून आतील गुरुनाथ ढगे यांच्यासह प्रवासी जखमी झाले. या प्रकरणी गुरुनाथ ढगे यांनी २० फेब्रुवारी राेजी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पाेलीस ठाण्यात भादंसंचे कलम २७९, ३३७, ३३८ आणि माेटार वाहन कायद्याचे कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.