उमरगा तालुक्यातील एकोंडी येथे २० मे रोजी एका अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती जिल्हा बालविवाह प्रतिबंधक समितीला प्राप्त झाली होती. यावरून सकाळी ८ वाजता समितीचे सदस्य सचिन बिद्री यांना ही माहिती कळविण्यात आल्यानंतर बिद्री यांनी याबाबत चौकशी केली. यात सदर मुलगी उमरगा तालुक्यातील माडज येथील असून, तिचे वय १५ वर्षे असल्याची माहिती समोर आली. तिचा विवाह एकोंडी येथील युवकाशी होणार होता. त्यावर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर आणि पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराधा उदमले यांच्या नियोजनाने उमरगा पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव यांनी तत्काळ विवाहस्थळी भेट दिली. यावेळी संबंधित परिवाराचे समुपदेशन करीत पालकांचे मनपरिवर्तन करून लेखी हमीपत्र घेतले. यावेळी पोहेकॉ वाल्मीकी कोळी, पोना विष्णू मुंडे, पोना लक्ष्मण शिंदे, हेकॉ रणजित लांडगे, होमगार्ड बाळू दूधभाते, आदी कर्मचारी उपस्थित होते.
पोलिसांच्या तत्परतेमुळे नियोजित बालविवाह टळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 4:34 AM