भूम - प्रशासकीय पातळीवर पालिका निवडणुकीची पूर्वतयारी तयारी सुरू झाली आहे. असे असतानाच दुसरीकडे गुडग्याला बाशिंग बांधून निवडणुकीच्या मैदानात उतरण्यास इच्छुक असलेल्या मंडळींकडूनही आतापासून सामाजिक माध्यमांवर प्रचाराची धूम चालविली आहे. निवडणूक वाॅर्डपद्धतीने हाेणार असल्याने इच्छुकांची संख्याही अधिक आहे.
काेराेनाचे संकट अद्याप टळलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पालिकांच्या निवडणुका हाेणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच २० ऑगस्टला राज्य निवडणूक आयाेगाने प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांना दिले. त्यानुसार प्रशासन कामाला लागले तर ‘औंदा इलक्शन लढायचचं’, अशी मनाशी खुनगाठ बांधलेले भूम शहरातील अनेक इच्छुक सामाजिक माध्यमांवर सक्रिय झाल्याचे पाहावयास मिळते. विविध सामाजिक उपक्रमांसाेबतच शासनदरबारी पाठपुरावा करून साेडविलेले प्रश्न मांडत आहेत. त्यामुळे भूम पालिकेची हाेऊ घातलेली निवडणूक यंदा अधिक चुरशीची हाेऊ शकते, हे आचारसंहितेपूर्वीच सुरू झालेल्या प्रचारावरून दिसते. मागील पाच वर्षांत स्थानिक राजकीय क्षेत्रात असंख्य बदल झाले आहेत. काँग्रेसचे काही नेत्यांनी हाती शिवबंधन बांधले तर काहींनी राष्ट्रवादीला रामराम ठाेकला. या दाेन्ही पक्षांत झालेल्या बदलांमुळे पालिकेच्या निवडणुकीत किती प्रभावी ठरतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, पालिकेतील विद्यमान सत्ताधाऱ्यांकडून विकासकामांवर भर दिला जाऊ लागला आहे. नागरिकांना अधिकाधिक सुखसुविधा उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तर यावेळी पालिकेची सत्ता काबिज करायचीच, असा चंग बांधत काही विराेधी नेत्यांनी सर्वपक्षीय पॅनेलची पूर्वतयारी सुरू केल्याची चर्चा आहे. राहुल माेटे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. भूम पालिकेसारखे महत्त्वाचे सत्ताकेंद्र आपल्या म्हणजेच राष्ट्रवादीच्या ताब्यात यावे, यासाठी त्यांच्याकडूनही यावेळी ताकद लावली जाण्याची शक्यता जाणकार मंडळी बाेलून दाखवत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी सवता सुभा थाटते की, राज्यातील महाविकास आघाडीप्रमाणे येथेही समीकरण जळवून आणतात, हे पाहणेही तितकेच औत्सुक्याचे ठरणार आहे.
चाैकट...
वाढदिवस ‘दणक्यात’
निवडणूक आयाेगाच्या निर्देशानुसार एकीकडे प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे तर आपापल्या भागातील लहान-माेठे प्रश्न साेडविण्यात आघाडीवर असलेल्या मंडळींना ‘‘भावी नगरसेवक’’ असे संबाेधताना अनेकजण दिसून येत आहेत. अशा भावी नगरसेवकांचे वाढदिवस सध्या दणक्यात साजरे हाेताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, यावेळी भूम शहरातून युवक पिढी निवडणुकीच्या मैदानात उतरण्यास इच्छुक असल्याचे दिसून येते.