कळंब - कळंब शहरातील वाढती रुग्णसंख्या व अपुरी वैद्यकीय सुविधा लक्षात घेऊन कळंब नगरपालिका व धनेश्वरी शिक्षण समूह यांनी संयुक्त विद्यमाने ५० खाटांचे कोविड सेंटर सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर केला आहे.
कळंब शहर व तालुक्यातील रुग्णसंख्या बघता व संभाव्य रुग्णवाढ लक्षात घेऊन कळंब येथे सर्व सुविधायुक्त कोविड सेंटर चालू करण्याची मागणी नागरिकांतून पुढे आली होती. कळंब येथील कोविड उपचार केंद्रात सध्या व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेडचा मोठा तुटवडा आहे. तातडीची वैद्यकीय उपचाराची आवश्यकता लागल्यास लातूर, बार्शी, उस्मानाबाद, अंबाजोगाई आदी ठिकाणी रुग्ण हलवावे लागत आहेत. साधी ‘एचआरसीटी’ तपासणी करण्यासाठी उस्मानाबाद गाठावे लागते. दरम्यान, रुग्णांना कळंब येथे उपचार मिळावे, यासाठी आता नगर परिषदेने पुढाकार घेतला आहे. धनेश्वरी संस्थेचे डॉ. प्रतापसिंह पाटील यांनीही या कोविड सेंटरला सर्व सुविधा पुरविण्याचा शब्द दिला आहे. जिल्हा प्रशासनाच्या निर्देशांनुसार पाणी, वीज, वैद्यकीय सुविधा, आहार व स्वच्छता यांची हमी घेऊन हे केंद्र सुरू करण्यास तयार असल्याचे पालिकेने उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांना लेखी पत्राद्वारे कळविले आहे.
यावेळी नगराध्यक्ष सुवर्णा मुंडे, उपाध्यक्ष संजय मुंदडा, राष्ट्रवादीचे गटनेते लक्ष्मण कापसे, धनेश्वरी संस्थेचे डाॅ. प्रतापसिंह पाटील, मुसद्दीक काझी, प्रा. संजय कांबळे, सागर मुंडे, महेश पुरी आदी उपस्थित होते. या प्रस्तावावर प्रशासनाने लवकर निर्णय घेण्याची मागणी आता पुढे येत आहे.
चौकट -
कळंब नगर परिषद व धनेश्वरी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कोविड केअर सेंटर चालू करण्याचा प्रस्ताव आम्ही प्रशासनाकडे दिला आहे. या प्रस्तावाला प्रशासन सकारात्मक प्रतिसाद देईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्या ठिकाणी आम्ही निश्चितच रुग्णांना चांगली सुविधा पुरवू, अशी माहिती नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे यांनी दिली.
चौकट
कळंब शहर व तालुक्याला वरिष्ठ स्तरावर भांडून सुविधा मिळविणारे खमके नेतृत्व नसल्याने व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड, रेमडेसिविर अशा सुविधांसाठी झगडावे लागत आहे. दुसरीकडे पर्याप्त लसी मिळतात. शासकीय रुग्णालयात सुविधा असल्याने व्यवस्थित उपचार होत आहेत. या महामारीत कळंबकरांचे हाल होत आहेत. हे चित्र थोडे बदलावे, स्थानिक पातळीवर योग्य उपचार व्हावा, यासाठी कळंबचे भूमिपुत्र डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या सहकार्याने आम्ही हे कोविड सेंटर सुरू करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे उपनगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी सांगितले.