वाशी (उस्मानाबाद ) : चौदाव्या वित्त आयोगातून उपलब्ध झालेला निधी मागासवर्गीय समाजबांधवांच्या वस्तीमध्ये खर्च न करणे बावी ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक व सरंपचास चांगलेच महागात पडले आहे.
कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत गटविकास अधिकाऱ्यांनी कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांना सादर केला. वाशी तालुक्यातील बावी येथील सरपंच शितल सुनिल शिंंदे व ग्रामसेवक एस. डी. भातलंवडे व पी. एम. जाधव यांनी १४ व्या वित्त आयोगातील मागासवर्गीय वस्तीसाठी तरतूदीनुसार खर्च केला नाही. तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अनुदानाचा दुबार प्रस्ताव दिल्याची तक्रार दत्तात्रय शिंदे यांनी केली होती.
या सर्व बाबींच्या अनुषंगाने गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता, सरपंच व ग्रामसेवक यांनी सन २०१७-१८ मध्ये मागासवर्गीय वस्तीमध्ये ‘एलईडी’ पथदिवे बसविल्याचे दिसून आले. परंतु, सन २०१५-१६, २०१६-१७ व २०१८-१९ या कालावधीत मागासवर्गीय वस्त्यांमध्ये कामे दर्शविलेली नाहीत. मागासवर्गीय वस्तीमध्ये तरतुदीनुसार विकास कामांवर खर्च करण्यास कार्यतत्परता दाखवली नाही, असे नमूद करीत सरपंच शितल शिंंदे यांच्याविरूद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ (१) अन्वये कारवाई प्रस्तावित करण्यात यावी, असा प्रस्ताव सादर केला आहे.
तसेच ग्रामसेवक भातलवंडे व जाधव यांनी कर्तव्यात कसूर केली असून चौकशीसाठी अभिलेखेही उपलब्ध करून दिली नाहीत. त्यांच्यामुळे या दोघांवरही शिस्तभंगाची कारवाई करावी, असा प्रस्ताव वरिष्ठांना दिला आहे. त्यामुळे आता वरिष्ठांच्या भूमिकेडे लक्ष लागले आहे.