उस्मानाबाद : शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भजे तळून आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्यशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
तरुणांना रोजगार नसल्याने बेरोजगारी वाढली आहे. असे असतानाच राज्यात येणारी वेदांता फॉसकॉन कंपनी राज्यशासनाच्या नाकर्तेपणामुळे गुजरातला गेल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शासनाच्या धोरणाविरोधात गुरुवारी आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी हातगाड्यावर भजे तळून व हाती गाजरं घेऊन शासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला. रोजगार द्या गाजरं घ्या, पंन्नास खोके एकदम ओके, वेदांत फॉसकॉन कंपनी गुजरातला नेणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशी घोषणाबाजी आंदोलनकर्त्यांनी केली.
उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुक्यातील व मंडळांना सरसकट ५० हजार रुपये अतिवृष्टी अनुदान देण्यात यावे, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ चे निकृष्ट दर्जाचे काम व अर्धवट उड्डाणपुलाची चौकशी करुन त्वरीत काम पूर्ण करा, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी लावून धरली होती. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, संजय पाटील-दुधगावकर, डॉ. प्रतापसिंह पाटील, विशाल शिंगाडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.