कळंब : शहरातील तांदुळवाडी रोड भागातील आश्रम शाळेच्या परिसरात मागील दीड ते दोन वर्षांपासून नळाद्वारे व्यवस्थित पाणीपुरवठा होत नसल्याने या भागातील महिलांनी गुरूवारी तहसील कार्यालय व नगर परिषदेत धाव घेऊन गाऱ्हाणे मांडले.
शहरातील तांदूळवाडी रोड भागात मोठी लोकवस्ती झाली आहे. त्यामुळे उपलब्ध पाईपलाईन आता अपुरी पडत आहे. मागील दीड दोन वर्षांपासून या भागात यामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होते आहे. यामुळे महिलांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. काही मंडळींना विकत पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे. कोरोना काळामुळे आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली असताना पाणीही विकत घ्यावे लागत असल्याचे महिलांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
याबाबत नगरपालिकेने त्वरित सर्वेक्षण करून तिथे नवीन पाईपलाईन टाकावी व पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे, असेही महिलांनी या निवेदनात म्हटले आहे. यावर काँग्रेसच्या महिला जिल्हा उपाध्यक्ष ज्योती सपाटे, संगीता पांचाळ, शिवकन्या काळे, मीरा मोरे, छाया मटके, भगीरथी पांचाळ, शारदा भावे, जयश्री भावे, नीता भावे, मीरा मोटे, केवळ कदम, छानुबाई कोठावळे, सुचिता मडके, सोनाली मडके, वेदिका पाटील, सुनीता पाटील, वैशाली पाटील, संजीवनी भोसले आदींच्या सह्या आहेत.