उमरगा : येथील नगरपालिकेच्या सार्वजनिक बोअरला महावितरणकडून पुरवठा करण्यात येणाऱ्या वीज बिलापोटी २० लाख २ हजार रुपये थकले आहेत. सदरची बाकी न भरल्याने महावितरणने शहरातील ३५ सार्वजनिक बोअरपैकी ९ बोअरचे वीज कनेक्शन शुक्रवारी बंद केले. शिवाय, उर्वरित बोअरचे वीज बिल न भरल्यास त्यांचीही वीज तोडण्यात येणार आहे. त्यामुळे शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उमरगा नगरपालिकेकडून शहरात ३५ सार्वजनिक बोअर सुरू असून, शहरात नळाला १५ दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने या सार्वजनिक बोअरचा नागरिकांना मोठा आधार आहे. सध्या या ३५ पैकी बहुतांश बोअर कायम बंद अवस्थेत असतात. शिवाय, शहराला पंधरा दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने शहरवासीयांवर विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे. शहरातील बोअरचे जानेवारी २०२१ अखेर २० लाख २ हजार रुपये वीज बिल थकले आहे. हे बिल भरण्याबाबत महावितरणकडून नगरपालिकेला वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही ते भरण्यात आले नाही, तसेच महावितरणचे उपकार्यकारी अभियंता राजेंद्र शेंडेकर यांनी नगरपालिकेत जाऊन पदाधिकारी व अधिकाऱ्यांची भेट घेऊन बिल भरण्याबाबत विनंती केली होती; परंतु पालिकेकडून वीज बिल भरण्याबाबत उदासीन भूमिका घेतली गेल्याने अखेर शुक्रवारी शहरातील ९ सार्वजनिक बोअरचे वीज कनेक्शन कट करण्यात आले. सोमवारी उर्वरित वीज कनेक्शन कट केल्यास शहरवासीयांना पाणीसंकटाचा सामना करावा लागणार आहे.
कोट.........
नगरपालिकेच्या ३५ सार्वजनिक बोअरचे जानेवारीअखेर २० लाख २ हजार रुपये वीज बिल थकीत आहे. पालिकेला सांगूनही बिल न भरल्याने ९ बोअरचे वीज कनेक्शन कट केले आहे. वीज बिल न भरल्यास सोमवारी उर्वरित बोअरची वीजही कट करण्यात येणार आहे.
- राजेंद्र शेंडेकर, उपकार्यकारी अभियंता, उमरगा
सोमवारी आम्ही वीज बिल भरणार असल्याचे महावितरणला सांगितले होते. असे असतानाही आम्हाला कोणतीही पूर्वकल्पना न देता वीज कनेक्शन कट करण्यात आले आहे. तरीही आम्ही सोमवारी वीज बिल भरणार असून, सार्वजनिक बोअरचे वीज कनेक्शन पूर्ववत चालू होईल.
-रामकृष्ण जाधवर, मुख्याधिकारी