उस्मानाबाद : भूम तालुक्यातील ईट येथील विजेचा प्रश्न मागील काही वर्षांपासून प्रलंबित आहे. गावठाण फिडरसाठी सातत्याने पाठपुरावा करूनही विद्युत महावितरण कंपनीकडून ही बाब फारशी गांभीर्याने घेतली जात नाही. त्यामुळेच माजी उपसरपंच तथा सदस्य प्रवीण देशमुख यांनी थेट ऊर्जामंत्र्यांचे कार्यालय गाठून व्यथा मांडली. प्रश्नाचे गांभीर्य ओळखून ऊर्जामंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी यांनी तातडीने अधीक्षक अभियंता पाटील यांच्याशी संपर्क करून प्रश्न तातडीने साेडविण्याचे निर्देश दिले.
ईट ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वर्णी लागल्यापासून ते कार्यकाळ संपेपर्यंत प्रवीण देशमुख यांनी ग्रामस्थांची विजेच्या लपंडावातून सुटका व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू केले हाेते. सातत्याने पाठपुरावा करूनही आजवर स्वतंत्र फिडर आणि ट्रान्सफार्मरचा प्रश्न कायम आहे. दरम्यान, महावितरणच्या जिल्हा, तालुका तसेच स्थानिक कार्यालयात अर्ज, विनंत्या करून काहीच फायदा हाेत नसल्याचे लक्षात आल्यानंतर देशमुख यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे कार्यालय गाठले. त्या ठिकाणी गेल्यानंतर मागणीच्या अनुषंगाने सविस्तर पत्र दिले. प्रश्नाचे गांभीर्य ओळखून ऊर्जामंत्री राऊत यांचे विशेष कार्य अधिकारी यांनी थेट उस्मानाबादचे अधीक्षक अभियंता पाटील यांना फाेन केला. ईटच्या गावठाण फिडरचा प्रश्न का सुटत नाही? अशी विचारणाही केली. गाठवाण फिडर आणि स्वतंत्र ट्रान्सफार्मरच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांना दिले.
चाैकट....
भूम तालुक्यातील सर्वात माेठी ईटची बाजारपेठ आहे. परिसरातील तरुण लहान-माेठे व्यवसाय सुरू करीत आहेत. परंतु, विजेच्या प्रश्नामुळे त्यांना फटका बसत आहे. हा प्रश्न मागील काही वर्षांपासून प्रलंबित आहे. सातत्याने पाठपुरावा करूनही ताे आजवर सुटला नाही. म्हणूनच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे जावे लागले. तेथे गेल्यानंतर अत्यंत आस्थेवाईकपणे प्रश्न ऐकून घेतला आणि थेट अधीक्षक अभियंत्यांशी बाेलून त्यांना हा प्रश्न मार्गी लावण्याबाबत आदेशित केले आहे. त्यामुळे आता हा प्रश्न लागेल, असा विश्वास आहे.
-प्रवीण देशमुख, माजी उपसरपंच, ईट.