वाशी : तालुक्यातील खानापूर ते इंदापूर हा शेतरस्ता अनेक दिवसांपासून अतिक्रमित होता. अखेर नायब तहसीलदार भालचंद्र यादव, मंडळ अधिकारी डी. ए. माळी, तलाठी ए. आर. साबळे यांनी रस्त्याच्या शेजारील शेतकऱ्यांचे समुपदेशन करून रस्ता वाहतुकीसाठी सुरू करून दिला. त्यामुळे शेतक-यांचा अनेक दिवसांपासूनचा शेतरस्त्याचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
तालुक्यातील खानापूर ते इंदापूर सर्वे नं. ११९, ११६, ११२, १२०, १२१ मधील शेतरस्ता नितीन कांबळे, ज्ञानोबा कदम, दादाराव कदम, प्रल्हाद कदम यांच्या शेतामधून जातो. मात्र गाळ, मोठ्या झाडा-झुडपांनी अतिक्रमित झाला होता. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणा-या शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. रस्ता सुरू करण्यासाठी नितीन कांबळे यांनी वाशीचे तहसीलदार यांचेकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार नायब तहसीलदार भालचंद्र यादव, मंडळ अधिकारी माळी, तलाठी साबळे यांनी २८ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष स्थळपाहणी करून संबंधित शेतकऱ्यांचे समुपदेशन केले. तसेच सामोपचाराने अतिक्रमित शेतरस्ता जेसीबीच्या सहाय्याने दुरूस्त करून वाहतुकीसाठी सुरू करून दिला. अशाच अतिक्रमित शेतरस्त्याचा प्रश्न सामोपचाराने सोडविण्याचे आवाहन तहसीलदार नरसिंग जाधव, नायब तहसीलदार भालचंद्र यादव यांनी केले आहे.