धाराशिव : धाराशिव पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी रावसाहेब ढवळशंख यांच्या शासकीय वाहनाची अज्ञाताने दगड मारून ताेडफाेड केली. हे वाहन कार्यालयासमाेर उभे करण्यात आले हाेते. ताेडफाेड काेणी केली? कशामुळे केली, या प्रश्नांची उत्तरे गुलदस्त्यात आहेत. या प्रकरणी बुधवारी दुपारपर्यंत पाेलिसांत तक्रार देण्यात आलेली नव्हती.
धाराशिव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ढवळशंख यांचे शासकीय वाहन कार्यालयाच्या पाेर्चमध्ये उभे करण्यात आले हाेते. मंगळवारी सायंकाळी साडेपाच-सहा वाजण्याच्या सुमारास कार्यालयातील बहुतांशी कर्मचारी घरी गेलेले असतानाच अज्ञाताने वाहनावर दगड मारून ताेडफाेड केली. यात वाहनाच्या काचांचा चुराडा झाला आहे. तसेच आतील वस्तूंचीही माेडताेड झाली आहे.
या प्रकरणी बुधवारी दुपारपर्यंत तरी पाेलिसांत गुन्हा दाखल झालेला नव्हता. याबाबत गटविकास अधिकारी ढवळशंख यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी याबाबतीत बाेलणे टाळले. त्यामुळे वाहन काेणी फाेडले? दगड मारण्यामागचे कारण काय, या प्रश्नांची उकल हाेऊ शकली नाही.
माजी नगरसेवकाच्या पुत्राचे कृत्य?धाराशिव पालिकेतील माजी नगरसेवकाच्या पुत्राने हे कृत्य केल्याची चर्चा आहे. यामागे पार्किंगचे कारण असल्याचेही बाेलले जात आहे. मात्र, या प्रकरणी काेणीच काही बाेलायला तयार नसल्याने खरे कारण स्पष्ट हाेऊ शकले नाही.