लोहारा (जि.उस्मानाबाद) : लोहारा तालुक्यातील जेवळी येथे दुचाकीला कट बसल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. यात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या वादावेळी एका गटातील तरुणाने हवेत गोळीबार केला होता. सोमवारी याप्रकरणी आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, यातील दोघांना लोहारा पोलिसांनी पिस्तुलासह ताब्यात घेतले आहे. ( angry young man firing in the air incident happen in Osmanabad )
लोहारा तालुक्यातील जेवळी येथून आठ ते दहा जण दुचाकीवरून लोहाऱ्याकडे जात होते. याचवेळी नितीन मिटकरी हा जेवळीकडे निघाला होता. दरम्यान, मिटकरी व दुसऱ्या गटात दुचाकीला कट बसल्याच्या कारणावरून बाचाबाची झाली. यातून मिटकरी यांना बेदम मारहाणीस सुरुवात केली. याप्रसंगी तेथून जाणाऱ्या काही नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर भांडण सोडवायचा प्रयत्न केला असता समूहाने असलेले तरुण नागरिकांच्याही अंगावर धावून गेले. याचवेळी राजू दिलीप मुळजे याने बंदूक काढून हवेत गोळीबार केला. घटनेची माहिती जेवळी गावात समजतात नागरिक घटनास्थळी दाखल झाले. यातून वाद वाढत जाऊन दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये जेवळी येथील नितीन मिटकरी व राजू मुळजे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जेवळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी उस्मानाबाद येथे पाठविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धरमसिंग चव्हाण घटनास्थळी दाखल झाले.
याप्रकरणी जेवळी येथील बसवराज कारभारी यांनी लोहारा ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन राजू दिलीप मुळजे (रा.जाजनमुगळी, कर्नाटक), ज्ञानेश्वर अभिमन्यू ममाळे, नागेश चेंडकापुरे (रा. धाकटीवाडी), गंगाराम वासुदेव, लहू जमादार, अविनाश जमादार (रा. येणेगुर ता.उमरगा), दिपक कोरे (भुसनी ता. उमरगा), व्यंकट शिरसे (कांबळेवाडी) या आठ जणांविरुध्द सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील ज्ञानेश्वर ममाळे, अविनाश जमादार या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयाने १२ ऑगस्टपर्यत पोलीस कोठडी सुनावली.