ट्रॅक्टरखाली चेंगरून बालकाचा मृत्यू
उस्मानाबाद : गाजीपुरा (जि. यवतमाळ) येथील अमोल राठोड हे ११ डिसेंबर रोजी तालुक्यातील वरूडा शिवारात लहू गाढवे यांच्या शेतात ऊस तोडीचे काम करीत होते. यावेळी त्यांचा मुलगा नागेश हा तेथेच झोपला होता. यावेळी रणजीत माने याने निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालविल्याने उसाच्या सरीमध्ये झोपलेल्या नागेश याच्या डोक्यावरून ट्रॅक्टरचे हेड गले. यात नागेश याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अमोल राठोड यांच्या फिर्यादीवरून येथील ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
बाजारकरूच्या खिशातून मोबाईल लांबविला
कळंब : येथील आठवडी बाजारात बाजारकरूच्या खिशातून मोबाईलची चोरी झाल्याची घटना घडली. शहरातील गांधी नगर भागातील राहणारे सूर्यकांत नागनाथ थळकरी हे जलाराम ट्रेडर्स दुकानाच्या समोर आठवडी बाजार करीत होते. यावेळी त्यांच्या खिशातील मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याप्रकरणी सूर्यकांत थळकरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २१ डिसेंबर रोजी येथील पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
लोणारवाडी येथे धाड; आठजणांविरुध्द गुन्हा
उस्मानाबाद : आंबी पोलिस ठाण्याच्या पथकाने परंडा तालुक्यातील लोणारवाडी येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी दत्ता नवनाथ किरदत्त, दरशथ रावसाहेब जमदारे, गजेंद्र किसन खरात, अनिल ज्योतीराम किरदत्त, भीमराव भाऊराव किरदत्त, सुनील ज्योतीराम किरदत्त, जगन्नाथ ज्योतीराम किरदत्त (सर्व रा. लोणारवाडी) व सोमनाथ भीमराव दैन (रा. शेळगाव) हे जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याविरुध्द आंबी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पदाधिकाऱ्यांनी घेतला पदभार
कळंब : येथील इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी सुनंदा अनिगुंठे तर सचिवपदी डॉ. संजीवनी जाधवर यांची निवड झाली. नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा रविवारी पार पडला. यामध्ये मावळत्या ध्यक्ष राजश्री देशमुख यांनी नूतन अध्यक्ष सुनंदा अनिगुंठे यांना तर नीता देवडा यांनी नूतन सचिव डॉ. संजीवनी जाधवर यांच्याकडे पदभार सोपविला. यावेळी प्रा. सुनील पवार, प्रा. हिवरे, गिरीष कुलकर्णी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात कळंबमधील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला. तसेच वर्षभरात घेतलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले.
प्रशिक्षणार्थी महिलांना प्रमाणपत्रांचे वितरणतुळजापूर : तालुक्यातील लोहगाव येथे कौशल्य विकास योजनेअंतर्गत महिलांसाठी आयोजित फॅशन डिझाईन प्रशिक्षणाचा नुकताच समारोप झाला. यावेळी सहभागी महिला व युवतींना सरपंच लोचना दबडे, ग्रामपंचायत सदस्य निजाम शेख, रवींद्र दबडे, करबसप्पा कलशेट्टी, दिगंबर मारेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक शाहुराज कदम यांनी केले तर निजाम शेख यांनी आभार मानले.
शेतकऱ्यांना दिल्या वसुलीच्या नोटिसा
गुंजोटी : गुंजोटी सज्जाअंतर्गत गावातील ३७ शेतकऱ्यांनी अपात्र अतानाही पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. यामुळे त्यांना सदरील रक्कम शासनाच्या खात्यावर जमा करण्याबाबत नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. शासकीय कर्मचारी, आयकर भरणा करणारे डाौक्टर, गुत्तेदार, मोठे व्यापारी यांचा यात समावेश आहे. हे अनुदान परत नाही केल्यास फौजदारी कारवाई केली जाईल, असे नोटिसीत नमूद केले आहे.
‘बस सुरू करा’
(एसटीचा फोटो)
भूम : तालुक्यातील आंतरगाव हायस्कूल चालू होऊन महिना झाला तरी भूम ते गणेगाव एसटी सोडण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून, ही बस त्वरित सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थी व पालकांमधून केली जात आहे.
गुटखा विक्री सुरूच
(फोटो)
परंडा : महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या गुटख्याची शहरासह तालुक्यात खुलेआम व जादा दराने विक्री होत
आहे. त्यामुळे प्रशासनाने यावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
दोघांवर कारवाई
उमरगा : येथील पोलिसांनी २१ डिसेंबर रोजी प्रभात हॉटेलच्या मागे छापा टाकला. यावेळी शिवायनमहा शरणाप्पा लवारे व शाहुली दस्तगीर शेख हे जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
घाणीचे साम्राज्य
उस्मानाबाद : शहरातील आठवडी बाजार परिसरात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. त्यामुळे बाजारानिमित्त येणाऱ्या व्यापारी, शेतकऱ्यांसह बाजारकरूंची देखील गैरसोय होत असून, येथे स्वच्छता ठेवावी, अशी मागणी होत आहे.
पथदिवे बंद
उस्मानाबाद : शहरातील समर्थ नगर भागातील काही पथदिवे सातत्याने बंद राहत आहेत. यामुळे नागरिकांना रात्रीच्या वेळी मोठा त्रास सहन करावा लागत असून, पालिका प्रशासनाने हे दिवे सुरु करण्याबाबत त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.