लोहारा : शहरासह तालुक्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून पडत असलेल्या रिमझिम पावसानंतर शुक्रवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने ओढ्या-नाल्यांना पाणी आले आहे. त्यामुळे पाऊस नसल्याने चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
लोहारा शहरासह तालुक्यातील माकणी, सास्तूर, होळी, कानेगाव, नागुर, कास्ती, धानुरी, जेवळी, आष्टाकासार, अचलेर, वडगाव, मार्डी, हिप्परगा, खेड, बेडकाळ, सालेगाव, तावशीगड आदी गावच्या शिवारात मृग नक्षत्राअगोदर झालेल्या पावसानंतर तुरळक पडलेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारली. यामुळे शेतकरी पाऊस पडेल की नाही, या चिंतेत होता. दरम्यान, त्यानंतर पडलेल्या रिमझिम पावसामुळे जमिनीतील ओलावा कायम राहिला. यामुळे पिकांना जीवनदान मिळाले. परंतु, म्हणावा तसा पाऊस न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता.
दरम्यान, मागील दोन ते तीन दिवसांपासून अधूनमधून पडत असलेल्या रिमझिम व शुक्रवारी रात्री तालुक्यात सर्वत्र झालेल्या जोरदार पावसाने ओढे, नाले भरून वाहू लागले. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे बंधारे फुटले असून, काही ठिकाणी शेत रस्त्याचेही नुकसान झाले आहे. तसेच तालुक्यातील आष्टा कासारसह परिसरात सलग तीन तास पडलेल्या दमदार पावसामुळे शेतकरी आनंदीत झाला आहे. मात्र, वाढलेल्या पाण्यामुळे व पाण्याच्या मार्गामध्ये ठिकठिकाणी अडथळा निर्माण झाल्यामुळे शेतीच्या बांधाऱ्यांचे व रोडचे मोठे नुकसान झाले आहे. आष्टा कासार ते मुरूम या मार्गावरील प्रवीण चुंनचुंनसुरे यांच्या शेताजवळील डांबरी रस्त्याच्या खालून पाणी गेल्याने हा रस्ता बंद आहे. यामुळे स्वामी समर्थ सेवा मंडळाचे संजय सोमवंशी यांनी रस्त्यांची पाहणी करून प्रशासनाला याची कल्पना दिली आहे. शनिवारी सकाळपासूनही पावसाचे वातावरण होते.
दोन मंडळात अतिवृष्टी
शुक्रवारी रात्री तालुक्यातील बहुतांश गावांत कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. यातही माकणी मंडळात ८८ मिमी तर लोहारा मंडळात ७१ मिमी पाऊस होऊन अतिवृष्टीची नोंद झाली. सर्वांत कमी २९ मिमी पाऊस जेवळी मंडळात झाला आहे.