कळंब : तालुक्यातील निपाणी शिवारात मग्रारोहयो योजनेंतर्गत करण्यात आलेल्या शेततळ्याची दोन कामे न करता पैसे उचलल्याचा अहवाल चौकशी समितीने दिल्यानंतर संबंधित कृषी सहायकास तालुका कृषी अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दरम्यान, समितीने स्पष्ट अहवाल दिला असताना, तालुका कृषी अधिकारी यांना अजून कोणता खुलासा हवा आहे? असा सवाल उपस्थित केला जातो आहे.
कळंब तालुक्यातील एकुरगा येथील सामाजिक कार्यकर्ते संदीपान कांबळे यांनी कळंब तालुका कृषी कार्यालयामार्फत तालुक्यातील वडगाव (शि) व निपाणी शिवारात २०१६ ते २०१८ या काळात करण्यात आलेल्या १५ शेततळ्यांबाबत तक्रार केली होती. ही शेततळ्यांची कामे कागदोपत्री दाखवून पैसे उचलल्याचे तक्रारीमध्ये म्हटले होते.
कांबळे यांच्या तक्रारीला प्रथम केराची टोपली दाखविल्यानंतर त्यांनी आंदोलन केले. त्याची गांभीर्याने दखल घेऊन जिल्हा कृषी अधीक्षकांनी भूमच्या उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली.
त्या समितीने दिलेल्या चौकशी अहवालात निपाणी शिवारातील दोन शेततळी न करता संबंधित अधिकाऱ्यांनी पैसे उचलल्याचे स्पष्टपणे नमूद केले होते. या अहवालानुसार त्या दोन कामात ८६ हजार १५३ रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले होते.
समितीमध्ये उपविभागीय कृषी अधिकारी होते. त्यांनी याप्रकरणी
स्पष्ट अहवाल दिला असताना, तालुका कृषी अधिकाऱ्यांनी पुन्हा संबंधित कृषी सहायकाला कारणे दाखवा नोटीस बजावल्यामुळे यामध्ये कोणाला तरी पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा कृषी कार्यालयात होते आहे.
चौकट -
तक्रार पंधराची, निष्कर्ष दोनचाच
तालुक्यातील वडगाव (शि), निपाणी शिवारातील १५ शेततळ्यांची कामे संशयास्पद असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संदीपान कांबळे यांनी सांगितले. चौकशी समितीने २ कामांमध्ये घोटाळा झाल्याचे स्पष्ट केले आहे, परंतु, आणखी १३ कामे अशाच पद्धतीने कागदोपत्री केली असावीत, अशी स्पष्ट शंका कांबळे यांनी व्यक्त केली. त्या कालावधीत तालुक्यातील शेततळ्याच्या कामांची त्रयस्थ संस्थेने चौकशी केली, तर मोठा घोटाळा समोर येईल, असेही ते म्हणाले.
चौकट -
मजुरांच्या नावावर पुन्हा खाबूगिरी
ही ठपका ठेवलेली शेततळी रोहयोमधून कागदावर दाखविली; पण प्रत्यक्षात ती झालीच नाहीत. म्हणजे मजुरांच्या नावावर तिसऱ्या व्यक्तीनेच पैसे उचलल्याचे स्पष्ट आहे. सध्या तालुक्यात चालू असलेल्या रोहयो कामांचीही तीच परिस्थिती असल्यामुळे मजुरांच्या नावावरील खाबूगिरी थांबणार कधी? हा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
चौकट -
खुलाशाबाबत माहिती घेऊ
निपाणी येथील शेततळीप्रकरणी संबंधित कृषी सहायक यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. परंतु, त्याला काय उत्तर दिले याबाबत माहिती उपलब्ध नाही. सध्या कृषी विभागाची ग्रामीण भागात मोहीम चालू आहे. कार्यालयात गेल्यावर नोटिसीबाबत माहिती घेऊ. त्याला उत्तर दिले नसले, तर दुसरी नोटीस बजावू, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी जाधव यांनी दिली.