गुणवंत जाधवर -
उस्मानाबाद: नावात काय आहे? या शेक्सपियरच्या विधानावर अनेक चर्चासत्रे झडली असतील. अनेक विद्वान आणि अभ्यासकांनी त्याचा किस पाडला असेल. मात्र, उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील दोन नावांची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. कारण, एकाच घरात राष्ट्रपती आणि पंतप्रधान जन्माला आलेत!
चिमुकल्या बाळांची नावं आगळ्या-वेगळ्या स्वरूपाची ठेवली जाण्याच्या घटना हल्ली कॉमन झाल्या आहेत. मात्र, उमरगा तालुक्यातील चिंचोली भुयार येथील दत्ता व कविता चौधरी या दाम्पत्याने आपल्या नवजात बालकाचे नाव चक्क ‘पंतप्रधान’ असे ठेवले. विशेष म्हणजे, त्यांच्या पहिल्या मुलाचे नाव ‘राष्ट्रपती’ आहे.
त्यामुळे आता राष्ट्रपती व पंतप्रधान हे दोघे एकाच कुटुंबात वाढणार आहेत. चौधरी दाम्पत्याने १९ जून २०२० रोजी जन्मलेल्या पहिल्या मुलाचे नाव ‘राष्ट्रपती’ असे ठेवले होते. तसे आधारकार्डही त्यांनी बनविले आहे. तर १० नोव्हेंबर २०२१ रोजी जन्मलेल्या मुलाचे नाव ‘पंतप्रधान’ ठेवले आहे. मुलाचे जन्म ठिकाण असलेल्या सोलापूर येथील महानगरपालिकेतून ‘पंतप्रधान दत्ता चौधरी’ या नावाने ते जन्म प्रमाणपत्र घेणार आहेत.
पंतप्रधानाचा नामकरण सोहळा मोठ्या थाटामाटात केला गेला. त्यासाठी खास पाळणा, आकर्षक सजावट केली, पाहुण्यांना निमंत्रण दिले. मग बाळाच्या कानात कुर्रर्र करुन त्याचं नाव ठेवलं गेलं. त्यामुळे ‘राष्ट्रपती’ आणि ‘पंतप्रधान’ हे दोघे भाऊ आता एकाच घरात बागडताना दिसणार आहेत.
लग्नाच्या अगोदरपासूनच मी मुलांची नावे राष्ट्रपती व पंतप्रधान ठेवण्याचा विचार केला होता. नावाचा त्या व्यक्तीच्या कर्तृत्वावर प्रभाव पडतो असे माझे मत आहे. माझ्या मुलाची नावे घटनात्मक पदाची आहेत. मात्र, यामागे माझा सकारात्मक दृष्टिकोन आहे. माझ्या मुलावर योग्य संस्कार करून त्यांना नावाप्रमाणेच बनवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. - दत्ता चौधरी, भुयार चिंचोली, उमरगा