इंदापूर (उस्मानाबाद ) : पाणीटंचाईमुळे संतापलेल्या झालेल्या वाशी तालुक्यातील इंदापूर येथील अनेक महिलांसह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आज सकाळी औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले़ गावाला कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना राबवावी, अशी आक्रमक मागणी यावेळी महिलांसह ग्रामस्थांनी लावून धरली होती़
सहा हजार लोकसंख्येच्या इंदापूर गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ ग्रामपंचायतीच्या १० पैकी केवळ २ हातपंपांना पाणी येते़ अपुऱ्या पावसामुळे ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़ गावातील तीव्र पाणीटंचाई पाहता मनसेच्या वतीने यापूर्वी इंदापुरातील पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता़ प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांसमवेत गुरूवारी सकाळी औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बोरीपाी जवळ रास्तारोको आंदोलन केले़
यावेळी घागरी हातात घेऊन अनेक महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या़ यावेळी मनसे महिला आघाडीच्या प्रमुख वैशाली गायकवाड, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट, सरपंच लक्ष्मी शिंदे, स्वाती गपाट, दत्ता बोंदर, बळीराज चेडे आदींनी मनोगत व्यक्त करीत शासन, प्रशासनाच्या कारभारावर टीका केली़ इंदापूर गावासाठी नांदगाव साठवण तलावातून कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना मंजूर करावी, अशी मागणी सर्वांनी लावून धरली होती़ तासभराच्या आंदोलनानंतर वाशी ठाण्याचे पोनि सतीश चव्हाण यांनी आंदोलकांना निवेदन देऊन आंदोलन थांबविण्याबात सूचित केले़
मात्र, निवेदन स्विकारण्यासाठी मंडळ अधिकारी आल्याचे पाहून महिलांनी आक्रमक पवित्रा घेत अधिकाऱ्यांना धारेवर धरले़ जोपर्यंत तहसीलदार येणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला़ त्यानंतर नायब तहसीलदार यादव यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांचे म्हणणे जाणून घेत निवेदन स्विकारले़ तसेच टंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्याचे व ग्रामस्थांच्या मागण्या वरिष्ठांपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले़ यावेळी मनसेचे सुरेश पाटील, दत्ता बोंदर, संतोष बारकूल, रोहिदास मारकड, वसंत बारकूल यांच्यासह ग्रामस्थ, विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या़
इंदापूर-गेलेगाव योजना बंदशासनाने सन १९९५-९६ मध्ये घोडकी तलावातून इंदापूर, गोलेगाव संयुक्त पाणीपुरवठा योजना राबविली होती़ साधारणत: नऊ कोटी पाच लाख रूपये खर्च करून राबविलेली ही योजना बंद पडली आहे़ ही योजना बंद पडल्याने गावातील पाणीप्रश्न अधिकच बिकट होत आहे़