उस्मानाबाद : सार्वजनिक वितरण योजनेंतर्गत धान्य पुरवठा करण्यात तांत्रिक अडचणी आल्याने राज्य शासनाने पोर्टेबिलिटीचा पर्याय खुला करून दिला आहे. या पर्यायामुळे अनेकांना रेशन दुकानांचा पर्याय उपलब्ध झाला असल्याने एखादा रेशन दुकानदार रेशन देत नसल्यास किंवा त्याच्याशी पटत नसल्याने कार्डधारक दुकानदार बदलून इतर दुकानात धान्य घेत आहेत. जून महिन्यात जिल्ह्यातील ८ हजार ३८५ कार्डधारकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.
सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत जिल्ह्यातील कार्डधारकांना अल्पदरामध्ये अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. अन्न सुरक्षा योजना, दारिद्र्यरेेषेखालील लाभार्थी अशा गटात वर्गीकरण करून लाभार्थ्यांना धान्य वितरित केले जाते. आतापर्यंत गहू, तांदूळ, साखर आणि डाळ आदी खाद्यपदार्थांचा पुरवठा केला जातो. या प्रक्रियेमध्ये अनेकवेळा रेशन दुकानदारांसंदर्भात तक्रारी होतात. वेळेवर दुकान सुरू राहत नाही. संपूर्ण रेशन वितरित होत नाही. या तक्रारींबरोबरच काही ठिकाणी लाभार्थ्यांच्या अडचणी असतात. त्यामध्ये रेशन दुकान घरापासून दूर असणे, एकाच रेशन दुकानावर अनेक लाभार्थी जोडल्याने धान्य प्राप्त करण्यास विलंब लागणे यासह काही लाभार्थ्यांना इतर शहरामध्ये स्थलांतरित व्हावे लागते. अशावेळी या लाभार्थ्यांना रेशनचा पुरवठा व्हावा, या उद्देशाने पोर्टेबिलिटी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत लाभार्थ्यांना त्यांच्या सोयीच्या केंद्रातून धान्य उपलब्ध करून घेण्यात येते. जून महिन्यात जिल्ह्यात ८ हजार ३८५ लाभार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.
प्राधान्य कुटुंब २,१०,१२२
अंत्योदय कुटुंब ३८,७९७
केशरी २२,३९२
शहरात जास्त बदल
ग्रामीण भागातून शहरी भागात मोठ्या प्रमाणात कामानिमित्त स्थलांतर होत असते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक शहरातील दुकानात धान्य घेतात. ग्रामीण भागात मोजकेच दुकाने असतात, तर काही ठिकाणी एकच दुकान असते. या गावातील नागरिकांना अन्य दुकानातून पाेर्टेबिलिटीद्वारे धान्य घेता येते. मजूर, कामगार, ऊसतोड मजूर हे मोठ्या प्रमाणात पोर्टेबिलिटीच्या साहाय्याने धान्य घेत आहेत.
नोव्हेंबरपर्यंत मिळणार मोफत धान्य
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षेअंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना मे, जून महिन्यात मोफत धान्य वितरित करण्यात आले. यात प्राधान्य कुटुंब अंत्योदय कार्डधारकांना या योजनेचा लाभ मिळत आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत धान्य वितरित करण्यात येणार आहे. प्राधान्य व अंत्योदय कार्डधारक कुटुंबातील प्रतिव्यक्ती २ किलो तांदूळ व २ किलो गहू वितरित केले जात आहेत.
कोणत्या तालुक्यात कितीजणांनी बदलला दुकानदार
भूम ३९०
कळंब १,०४०
लोहारा ७६७
उमरगा ८०४
उस्मानाबाद १,३७१
परंडा १,६७४
तुळजापूर १,७८६
वाशी ६१३