उस्मानाबाद -कळंब तालुक्यातील माेहा येथे घाना देशातून परलेल्या एका कुटुंबातील बाप-लेकास ओमायक्राॅनचा संसर्ग झाल्याचे गुरूवारी अहवालाअंती समाेर आले. त्यामुळे जिल्ह्यातील रूग्णांची संख्या आता पाचवर जावून ठेपली आहे.
व्यवसायानिमित्त माेहा येथील एक कुटूंब घाना देशात स्थायिक हाेते. जगातील इतर देशांसाेबतच घाना याही देशात ओमायक्राॅनने डाेके वर काढले आहे. त्यामुळे हे कुटूंब चार-पाच दिवसांपूर्वी हायरिस्क असलेल्या घाना देशातून विमानाने थेट दिल्लीत उतरले हाेते. सर्वांची टेस्ट केली असता, रिपाेर्ट निगेटिव्ह आला हाेता. यानंतर हे कुटुंब माेहा येथे दाखल झाले. राज्यस्तरीय कार्यालयाकडून संबंधित कुटुंबाची माहिती आराेग्य विभागाला समजल्यानंतर आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली.
या चाचणीत बाप-लेकाचा रिपाेर्ट पाॅझिटिव्ह आला हाेता. त्यामुळे या दाेघांनाही जिल्हा रूग्णालयात भरती करून उपचार सुरू केले हाेते. तसेच ओमायक्राॅनच्या चाचणीसाठी सॅम्पल पुणे येथे पाठविले हाेते. हा अहवाल गुरूवारी आराेग्य विभागाला प्राप्त झाला. त्यानुसार बाप-लेकास ओमायक्राॅनची लागण झाल्याचे समाेर आले आहे. यापूर्वी उस्मानाबाद तालुक्यातील बावी येथे तीन रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ओमायक्राॅनग्रस्त रूग्णांची संख्या पाचवर जावून ठेपली आहे.