तुळजापूर (जि. धाराशिव) : राज्य सरकारने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतरण करून त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. असे असताना या नावांना विरोध करणाऱ्या तसेच संभाजी महाराजांची हत्या करणाऱ्या औरंगजेबाचे फोटो कार्यक्रमात लावून त्याचे उदात्तीकरण केल्याप्रकरणी खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात संभाजी ब्रिगेडच्या वतीने मंगळवारी तुळजापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असलेल्या रथासह विद्रोह मोर्चा काढण्यात आला.
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तुळजाभवानी मंदिर, महाद्वार रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती संभाजी महाराज स्मारक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाने हा विद्रोह मोर्चा तहसील कार्यालयावर जाऊन धडकला. या ठिकाणी खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रतिमेस जोडे मारत प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शरद पवार, प्रदेश संघटक अतुल गायकवाड, किशोर गंगणे, संघटक दिनेश जगदाळे, पुणे विभागीय अध्यक्ष किरणराज घाडगे, सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत, मराठा मूक मोर्चा राज्य समन्वयक सुनील नागणे, महेश गवळी, जीवनराजे इंगळे, अर्जुन साळुंखे, अमरराजे कदम, महेश चोपदार, जगन्नाथ गवळी, धनराज बिराजदार, बालाजी यादव, महादेव मगर यांच्यासह हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते.