भूम : प्रशासनाने कोरोनाबाबत घालून दिलेले नियम न पाळल्याने महसूल, पोलीस प्रशासन व पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत तालुक्यात ४ लाख २३ हजार ५१ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. असे असले तरी कोरोनाबाबत अजूनही नागरिक गंभीर नसल्याचेच दिसत आहे.
तालुक्यात मार्च महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. या लाटेत गंभीर रुग्णांची संख्या वाढली. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. घरातील कर्ती व्यक्ती गेल्याने अनेक कुटुंबे उघड्यावर आली. परंतु, एवढे होऊनही नागरिक मात्र नियमांबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.
नागरिकांनी नियमांचे पालन करावे, यासाठी प्रशासनाकडून दंडात्मक कारवाईची मोहीमही हाती घेण्यात आली. यादरम्यान पथकाने तीन महिन्यांत विनामास्क आढळून आलेल्या ७७२ नागरिकांवर दंडात्मक कार्यवाही करीत २ लाख ८ हजार २५१ रुपयांचा दंड वसूल केला. शिवाय, नियमांचे उल्लंघन करीत व्यवसाय केल्या प्रकरणी ९११ कारवाया करीत २ लाख १४ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, सध्या तालुक्याचा रिकव्हरी रेट ९१.१७ टक्के आहे. ही चांगली बाब असली तरी कोरोनाची तिसरी लाट येण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने १५ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवले आहे. त्यामुळे नागरिकांनी आता तरी नियमांचे पालन करावे, असे आवाहन तहसीलदार उषाकिरण श्रृंगारे यांनी केले आहे.
310521\1741img-20210531-wa0040.jpg
दंडाची कार्यवाही फोटो