कळंब आगाराच्या नव्वदेक बसगाड्या दररोज किमान ३० हजार किमी अंतर कापतात. यासाठी एकूण ६५ शेड्यूलमधील चारशेवर फेऱ्या होत असतात. याची तिसेक हजार प्रवाशांना सेवा मिळत असते. मात्र, या सर्व प्रवासाला गती देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या डिझेल इंधनाची आगाराला अचानक कमतरता भासू लागली आहे. बुधवारी तर याचा साठा अतिशय अल्प स्वरूपात राहिल्याने शेवटी लालपरीचा दररोजचा ‘टाइमटेबल’च बिघडला. आगारात डिझेल नसल्याने एरव्ही भल्या सकाळी रस्त्यावर धावणाऱ्या गाड्या आगारात स्थितप्रज्ञ अवस्थेत बसून होत्या. यामुळे एकूण ६५ पैकी केवळ २४ शेड्यूल कार्यान्वित झाले आहेत.
यासंबंधी वाहतूक अधिकारी भारती यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यास दुजोरा दिला. एकूणच या प्रकारामुळे प्रवाशांची मात्र मोठी गोची झाली आहे.