रस्त्यावरील किंवा रस्त्यावरून जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रीतीने चालावे, त्यांची वर्तणूक किंवा वागणूक कशी ठेवावी, याविषयी निर्देश देणे, अशा मिरवणुकांचे मार्ग विहित करणे. सर्व मिरवणुकीच्या व जमावांच्या प्रसंगी प्रार्थनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्यावरून किंवा सार्वजनिक जागी किंवा लोकांच्या एकत्र जमण्याच्या जागी, गर्दी होणार असेल किंवा अडथळा निर्माण होण्याची शक्यता असेल, अशा सर्व ठिकाणी अडथळा होऊ न देणे, ही जबाबदारी या अधिकाऱ्यांनी पार पाडावयाची आहे.
सर्व रस्त्यावरील. नद्यांच्या घाटांवर सार्वजनिक ठिकाणी, स्नानाच्या, कपडे धुण्याच्या ठिकाणी जागेमध्ये बंदोबस्त व सुव्यवस्था राखणे, कोणत्याही रस्त्यावर सडकेजवळ किंवा सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ वाद्य वाजविणे आणि शिंगे, कर्कश वाद्य वाजविणे यावर नियमन करणे किंवा त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम संबंधित अधिकाऱ्यांनी करावयाचे आहे. सक्षम अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ३३, ३४, ३७ ते ४१ या कलमान्वये केलेल्या कोणत्याही नियमनात्मक आदेशांच्या अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे आवश्यक आहे. जो कोणी नियमनात्मक आदेशांचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन करेल तो महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३४ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही जिल्हा पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी याबाबतच्या आदेशात म्हटले आहे.