उस्मानाबाद नगरपालिकेची सध्या करवसुली मोहीम जोरात सुरू आहे. मार्चअखेरपर्यंत वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून कराची वसुली करण्यात येत आहे. कोरोनामुळे जवळपास सहा महिन्यांहून अधिक काळ कर वसुली करता आली नाही. त्यामुळे आता गती दिली गेली आहे. दरम्यान, नियमित कर भरणा करणाऱ्या मालमत्ताधारकांची संख्या शहरात चांगली आहे. तरीही काही महाभाग वर्षानुवर्षे पालिकेचा कर चुकवून त्याकडे कानाडोळा करीत आहेत. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय सभेत बड्या थकबाकीदारांना हिटलिस्टवर घेत वसुली करण्याचा अन् प्रसंगी मालमत्ता जप्त करण्याचाही निर्णय घेण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर प्रशासन आता ॲक्शन मोडमध्ये आले आहे. पहिल्या टप्प्यात ५० बड्या थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली आहे. हे केवळ ५० जण ८० लाख रुपयांचा कर चुकवूनही स्वस्थ बसले आहेत. यातील २० जण तर वर्षानुवर्षे करच भरत नसल्याचेही समोर आले. त्यामुळे आवाहन केल्यानंतरही कर न भरणाऱ्या या महाभागांची नावे वर्दळीच्या ठिकाणी, चौकांमध्ये प्रसिद्ध केली जाणार आहेत. यानंतरही कर भरण्याकडे कानाडोळा केल्यास त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे सर्वच मालमत्ताधारकांनी तातडीने आपला कर भरून घेण्याचे आवाहन मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांनी केले आहे.
बड्या थकबाकीदारांची अब्रु आता भरचौकात टांगणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 4:44 AM