भूम : तालुक्यातील गणेगावात अवैधरीत्या दारू विक्री सुरू आहे. त्यामुळे विशेषकरून तरुण पिढी अशा व्यसनाच्या आहारी चालली आहे. ही समस्या लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने दारूबंदीचा ठराव घेतला आहे. या ठरावाची काटेकाेरपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी भूम पाेलिसांना निवेदनही दिले आहे.
काेराेनाचे संकट असतानाही गावात चाेरट्या पद्धतीने अवैधरीत्या दारूविक्री केली जात आहे. गावातील तरुण व्यसनाधीन हाेऊ लागले आहेत. एवढेच नाही तर व्यसनाच्या आहारी गेलेल्या अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. ही बाब समाेर आल्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीने दारूबंदीचा ठराव घेण्याच्या अनुषंगाने ३० एप्रिल राेजी विशेष मासिक सभा बाेलावण्यात आली हाेती. या सभेला सरपंच, उपसरपंच तसेच सदस्य उपस्थित हाेते. गावात दारूबंदी करण्याच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा झाली. चर्चेअंती सर्वानुमते दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची काटेकाेरपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी निवेदनासह ठरावाची प्रत भूम पाेलिसांना दिली. गावासह शिवारात सुरू असलेली अवैध दारू विक्री तातडीने थांबवावी, अशी मागणी संबंधित निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर सरपंच समाधान कुंभार, उपसरपंच प्रशांत राजे जाधव, सदस्य गजानन चव्हाण, शहीदाबी सय्यद यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या या निर्णयाला पाेलीस यंत्रणेचे कितपत पाठबळ मिळते, हे येणाऱ्या काळात दिसणार आहे.