उस्मानाबाद : बेकायदेशीररित्या अँटीजन टेस्ट करणाऱ्या शहरातील विद्याविकास डायग्नोस्टिक सेंटरवर महसूल विभागाच्या पथकाने बुधवारी छापा मारला. या कारवाईत अँटीजन टेस्ट किटचा मोठा साठा जप्त केला असून डायग्नोस्टिक सेंटरविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उस्मानाबाद शहरातील एका खाजगी हॉस्पिटलला लागूनच विद्याविकास डायग्नोस्टिक सेंटर आहे. या सेंटरमध्ये विनापरवाना अँटीजन टेस्ट करण्यात येत होत्या. सहाशे रूपयांच्या तपासणीसाठी दोन ते अडीच हजार रूपये उकळले जात असल्याची माहिती महसूल विभागाला प्राप्त झाली. त्यानुसार ‘महसूल’च्या पथकाने विद्याविकास डायग्नोस्टिक सेंटरवर बुधवारी अचानक छापा मारला. या कारवाईत अँटीजेन टेस्टसाठीच्या किटचा साठा जप्त करण्यात आला. बुधवारी रात्री उशिरा तलाठी मनोजकुमार राऊत यांच्या फिर्यादीवरून सेंटरविरूद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
विद्याविकास डायग्नोस्टिक सेंटरवर महसूल विभागाने छापा मारल्यानंतर या कारवाईची माहिती आरोग्य विभागाला देण्यात आली. डायग्नोस्टिक सेंटरविरूद्ध आरोग्य विभागाने पोलीस कारवाई करावी, असे महसूलचे म्हणणे होते. परंतु, छापा आम्ही मारलेला नाही. त्यामुळे आरोग्य विभागाने गुन्हा दाखल करणे संयुक्तिक होणार नसल्याचे कारण देत गुन्हा नोंदविण्यास नकार दिला. त्यामुळे सेंटरवर छापा मारण्यासोबतच गुन्हा दाखल करण्यासाठीही महसूल विभागालाच पुढे यावे लागले.