उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या श्री तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यात तत्कालीन अधिकाऱ्याने हेराफेरी केल्याचे उघड झाल आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, हे आदेश तहसीलदारांना पोहोचले नसल्याने शुक्रवारी कारवाई टळली आहे.
श्री तुळजाभवानी देवीचा प्राचीन खजिना आहे. यामध्ये त्या-त्या वेळच्या राजेरजवाड्यांनी भेट म्हणून दिलेली दुर्मिळ ७२ नाणी आहेत. यामध्ये पोर्तुगीज राजाने दिलेल्या नाण्याचाही समावेश आहे. याशिवाय, हिरे-रत्न जडित जवाहिरे, सोन्या-चांदीचे अलंकार, अशा विविध मौल्यवान वस्तूंचा खजिन्यात समावेश आहे.
दरम्यान, याठिकाणी धार्मिक सहव्यवस्थापक म्हणून काम पाहिलेले दिलीप नाईकवाडी यांनी त्यात हेराफेरी करुन नाणी व काही मौल्यवान, दुर्मिळ वस्तूंत गैरप्रकार केल्याची तक्रार तुळजापूर येथील किशोर गंगणे यांनी जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्षांकडे केली होती. त्यावर अपर जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने दिलेल्या अहवालानुसार खजिन्यात गडबड झाल्याचे समोर आले.
zत्यानंतर गृह विभागाच्या उपसचिवांनी ८ एप्रिल २०२० रोजी तत्कालीन धार्मिक सहव्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांना दिले होते. नंतर हे प्रकरण कारवाईसाठी उस्मानाबादच्या पोलीस अधीक्षकांकडे देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी गुरुवारी दिलीप नाईकवाडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी तुळजापूरच्या तहसीलदार तथा मंदिराच्या व्यवस्थापक योगिता कोल्हे यांना प्राधिकृत केल्याचे आदेश काढले आहेत. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळपर्यंतही योगिता कोल्हे यांच्या हाती जिल्हाधिकाºयांचा आदेश पडलेला नव्हता.