उस्मानाबाद : मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत असल्यामुळे काढणीला असलेल्या सोयाबीनसह उसाला मोठा फटका बसला आहे. आजवर जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या सुमारे ९९.१ टक्के एवढा पाऊस नोंदविला गेला आहे.
यंदा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पावसाने दमदार सुरूवात केली होती. पुढेही पावसाने हे सातत्य कायम राखले. त्यामुळे दि. ११ ऑक्टोबरअखेर जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ६२६.५ मिमी म्हणजेच ९९.१ टक्के एवढा पाऊस नोंदविला गेला. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यात आजवर ६५५.३ मिमी पाऊस पडला आहे. याचे प्रमाण ९८.३ टक्के आहे.
दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या भूम तसेच परंडा तालुक्यात यंदा प्रत्येकी ९४.३ टक्के पाऊस पडला आहे. वाशी तालुक्यात ९८.१ तर तुळजापूर तालुक्यामध्ये सर्वात कमी ८५.२ मिमी टक्के पाऊस झाला आहे. दरम्यान, तीन तालुक्यांत पावसाने शंभरी ओलांडली आहे. कळंब तालुक्यात १०१.३ टक्के, उमरगा १२६.८ टक्के तर लोहारा तालुक्यात १२१.६ टक्के एवढा पाऊस झाला आहे. असे असतानाच हवामान खात्याने केलेल्या भाकितानुसार मागील दोन दिवसांपासून पुन्हा पाऊस होऊ लागला आहे.
हा पाऊस रबी पेरणीसाठी पुरक ठरणारा असला तरी सध्या काढणी सुरू असलेल्या सोयाबीनसह उसाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे हजारो हेक्टवरील ऊस आडवा झाला आहे. पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश लघु, मध्यम तसेच साठवण तलाव तुडूंब भरले आहेत. काही प्रकल्प तर ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासोबत शेतीच्या सिंचनासाठी संबंधित प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.