उमरगा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जवळपास सात-आठ महिने सर्व व्यवहार, बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. परंतु, सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने बाजारपेठ सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. असे असले तरी वाढती महागाई, तेलाचे वाढते दर, सर्वसमन्याचे बिघडलेले आर्थिक नियोजन यामुळे बाजारपेठेत अजूनही ग्राहकी वाढली नसल्याचे चित्र आहे. उमरगा शहर हे तालुक्याचे ठिकाण असून कर्नाटक सीमेवरील महाराष्ट्रातील एक मोठे शहर आहे. शहरात मोठी बाजारपेठ असून कपडा, किराणा, भुसार,भांडे, सराफा दुकानांची संख्या मोठी आहे. तसेच लहान-मोठ्या साहित्य विक्रीचा व्यापारही चांगला आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागाबरोबरच कर्नाटक सीमेवरील गावांचाही व्यापार व खरेदी तसेच दवाखान्यामुळे या शहराशी थेट संबंध येतो. या माध्यमातून बाजारपेठत आर्थिक उलाढाल मोठी होत असते.
दरम्यान, गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे लॉकडाऊन लावण्यात आले. यानंतर तब्बल सात-आठ महिने सर्व दैनंदिन व्यवहार बंद राहिले. उमरगा शहरातही हीच परिस्थिती होती. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात दुकाने उघडण्यास प्रशासनाने परवानगी दिल्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला. परंतु, लॉकडाऊन नंतर वाढलेले इंधनाचे दर, यातून वाढलेली महागाई यामुळे सर्वसामान्य नागरिकांनीही खरेदीसाठी हात आखडता घेतला. अजूनही नागरिक आवश्यक तेवढीच खरेदी करून असल्यामुळे व्यवसायातून दुकानाचे भाडे निघणेही कठीण होत असल्याचे व्यापारी सांगत आहेत.
चौकट......
लग्नसराईतही शुकशुकाट
सध्या लग्नसराईचा सिझन असतानाही बाजारपेठेत गर्दी होताना दिसत नाही. सोलापूर व लातूर सारख्या जवळच्या शहरात होलसेल भावात खरेदी करता येत असल्याने ग्राहकांचा ओढा या शहराकडे जास्त वाढला आहे. तसेच
ऑनलाइन खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला असून, खरेदीच्या भावात वस्तू विकणे व्यापाऱ्यांना परवडणारे नाही. दुकानभाडे, कामगारांचे वेतन, वीज बिल याची भरपाई कशातून करावी, असा प्रश्न सध्या व्यापाऱ्यांसमोर आहे.
कोट....
बाजारपेठेत ग्राहक नसल्याने मोठा आर्थिक फटका बसत आहे. दुकानभाडे, कामगार वेतन, वीज बिल, टॅक्स इत्यादींचा खर्च काढणे मुश्कील होत आहे. वाढती महागाई व त्यात कोरोना काळात सर्वसामान्यांचे आर्थिक नियोजन बिघडलेले आहे. त्यामुळे सरकारने महागाई कमी करण्यासाठी तातडीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
- संतराम मुरजानी, कपडा व्यापारी
कोट...........
सध्या लग्नाचा सिझन असतानाही उमरगा शहरातील बाजारपेठ ओस आहे. ऑनलाइन बिझनेस, कमी किमतीमध्ये फुटपाथवर विक्री, त्यातच वाढती महागाई यामुळे बाजारपेठेत ग्राहक दिसत नाहीत. लाखो रुपयांचे भांडवल, दुकानभाडे, लाइट बिल, नोकरांची पगार व प्रशासनाचे विविध प्रकारचे टॅक्स भरून दुकानदार आर्थिक अडचणीत येतोय.
- कुमार पवार, इलेक्ट्रॉनिक दुकानदार