उस्मानाबाद : कोरोना विषाणू संसर्गातून सावरलेल्या बालकांना आता एमएसआय-सी अर्थात मल्टी सिस्टिम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम नावाच्या आजाराचा धोका आहे. या सिंड्रोममुळे शरीराचे अनेक अवयव प्रभावित होतात. उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ३ बालकांस हा आजार जडला होता. बालके उपचाराअंती ठणठणीत झाले आहेत. मात्र पालकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिकांना अधिक संसर्ग झाला होता. दुसऱ्या लाटेत तरुणांसह बालकांना कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. जिल्ह्यात ० ते १५ बालकांना संसर्गाची बाधा झाली होता. कोरोनातून बरे झालेल्या बालकांना आता एमएसआय-सी अर्थात मल्टी सिस्टिम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम आजाराचा धोका आहे. यामुळे ताप येणे, मुलांचे डोळे लाल होणे, त्वचेवर सुरकुत्या पडणे, मळमळ व उलट्या होणे, मुलांच्या पोटात सतत दुखत राहणे यांसारखी लक्षणे दिसून येतात. मात्र सुदैवाने उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाच्या दोन्ही लाटांत बाधित आढळलेल्या बालकांपैकी ३ बालकांना या आजाराची लागण झाली होती. उपचाराअंती रुग्ण ठणठणीत झाले आहेत.
ही घ्या काळजी
१ कोरोनातून बरे झालेल्या मुलांना तोंडाला मास्क लावल्याशिवाय घराबाहेर पडू देऊ नका. खूप ताप आल्यास आणि तो लवकर नियंत्रणात येत नसल्यास मुलांना तत्काळ डाॅक्टरांकडे नेऊन उपचार घ्यावे.
२ मल्टी सिस्टिम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम होणे. त्वचेवर सुरकुत्या पडणे, मळमळ आणि उलट्या हाेणे, सतत पोटात दुखणे आदी प्रकारची लक्षणे आढळतात. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या मुलांना अशा प्रकारचा कुठलाही त्रास होत असल्यास विनाविलंब उपचार घेणे अधिक सोईस्कर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पॉइंटर....
कोरोनाचे एकूण रुग्ण ५८,२६३
कोरोनावर मात केलेले रुग्ण ५६,२६८
जिल्ह्यात एकूण कोरोना मृत्यू १,३७३
उपचार घेत असलेले रुग्ण ६२२
जिल्ह्यात ४,५५६
बालकांना कोरोना
जिल्ह्यात गतवर्षी एप्रिल महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. अद्यापपर्यंत ४ हजार ५५६ बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर ३ बालकांना एमएसआयसी आजार झाला होता.
कोट...
जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या लाटेत २ हजार ५५६ बालकांना कोरोनाची बाधा झाली होती. जिल्हा रुग्णालयात एमएसआयसी आजाराच्या तीन रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. बालकांना २१ दिवसांपर्यंत स्टेरॉईड द्यावे लागते. संसर्गजन्य आजार नसल्यामुळे याचा धोका कमी आहे.
- डॉ. सचिन बोडके, निवासी वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालय